Sangli: नशेच्या इंजेक्शनचे उत्तर प्रदेशातून वितरण, मुख्य पुरवठादार जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:59 IST2025-02-07T17:58:33+5:302025-02-07T17:59:21+5:30
वितरण साखळी मुरादाबादपर्यंत, आरोपींची संख्या १३ वर

Sangli: नशेच्या इंजेक्शनचे उत्तर प्रदेशातून वितरण, मुख्य पुरवठादार जेरबंद
मिरज : वैद्यकीय वापरासाठी असलेले, मात्र नशेसाठी वापर होणाऱ्या मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा पुरवठा उत्तर प्रदेशातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गांधी चौक पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून इंजेक्शनचा मुख्य पुरवठादार इंतजार अली जहीरुद्दीन यास अटक केली. न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.
मिरजेतील गांधी चौक पोलिसांनी दि. २० रोजी वैद्यकीय वापरासाठी असलेल्या मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा सांगली, मिरज परिसरात नशेसाठी विक्रीसाठा करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मेफेन्टरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा ६ लाख १६ हजार रुपये किमतीचा अवैध साठा, ८ लाख ३० हजारांचे चारचाकी व दुचाकी वाहन असा एकूण १४ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या सांगलीतील तीन आरोपींची कसून चौकशी करून मेफेन्टरमाइन इंजेक्शनची वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड केली. सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात वितरण, विक्री व साठा करणारे रोहित कागवाडे (रा. सांगली), ओंकार मुळे (रा. सांगली), अशपाक पटवेगार (रा. सांगली), वैभव उर्फ प्रशांत पाटोळे (रा. कडेगाव), ऋतुराज भोसले (सांगलीवाडी), अमोल मगर, साईनाथ वाघमारे, अविनाश काळे, देवीदास घोडके (सर्व रा. माळशिरस), आकाश भोसले (रा. माण), हनुमंत शिंदे (रा. माळशिरस), ललित पाटील (रा. शाहूवाडी) या बारा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
नशेसाठी वापर होणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा कोठून होतो, याचा तपास करताना सांगलीतील अशपाक पटवेगार हा काळ्या बाजारातून अवैध मार्गाने उत्तर प्रदेश मुरादाबाद येथील इंतजार अली जहीरुद्दीन याच्याकडून मेफेन्टरमाइन इंजेक्शन मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने उत्तर प्रदेशात मुरादाबाद येथून इंतजार अली जहीरुद्दीन यास ताब्यात घेऊन मिरजेत आणले. मिरज न्यायालयाने इंतजार अली जहीरुद्दीन यास तीन दिवस पोलिस कोठडी दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले.