होती लाट म्हणून केलात थाट... आता या मैदानात, लावतो वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:07+5:302021-07-23T04:17:07+5:30
अर्जुन कर्पे लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : ‘आम्ही येत आहोत... होती लाट म्हणून केलात थाट... आता या मैदानात लावतो ...
अर्जुन कर्पे
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : ‘आम्ही येत आहोत... होती लाट म्हणून केलात थाट... आता या मैदानात लावतो एकेकांची वाट’ अशा आशयाचे संदेश माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आगामी सर्व निवडणुकांसाठी ते मोर्चेबांधणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर घोरपडे तालुक्यात नवा राजकीय अध्याय सुरु करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात तब्बल १५ वर्ष आमदारकी सांभाळली. राज्यमंत्रीपद मिळवून कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर त्यांच्या वाटचालीत राजकीय अडथळे आले. आर. आर. पाटील यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेतला. घोरपडे यांनी गत विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली. या निवडणुकीमध्ये ‘खासदार ही आमचा आणि आमदार ही आमचाच’ या तासगावकरांच्या राजकीय भूमिकेमुळे कवठेमहांकाळच्या या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला. परंतु, आज तालुक्यात राजकीय बदल दिसू लागले आहेत.
निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी, राजकीय दलालांची रेलचेल याला येथील मतदार आता वैतागला आहे. काही महिन्यांवर कवठेमहांकाळ नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेच्या सभापती आशाताई पाटील, वैभव नरुटे, दिलीप झुरे, तुकाराम पाटील, रावसाहेब पाटील, पांडुरंग पाटील, सुनील माळी, सनी पडळकर, सुभाष सूर्यवंशी यांनी तालुक्यात युवकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. ‘आम्ही येत आहोत... होती लाट म्हणून केलात थाट... आता या मैदानात, लावतो एकेकाची वाट’ अशा आशयाचे संदेश त्यांनी व्हायरल केले आहेत.
चौकट
यांच्या हाती धुरा
लवकरच तालुक्यात ‘सरकार प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात येणार असून, याची धुरा करोली (टी) येथील वैभव नरुटे, चोरोचीचे सरपंच रावसाहेब पाटील, कवठेमहांकाळ विकास सोसायटीचे अध्यक्ष दिलीप झुरे, तुकाराम पाटील, सुनील पाटील, नरसिंहगावचे उपसरपंच अरुण भोसले सांभाळणार आहेत. तालुक्यात पुन्हा एकदा अजितराव घोरपडे गटाचे वादळ घोंगवणार असल्याचे चित्र आहे.