हप्ता भरायला उशीर झाला, घरी येतोय वसुलीवाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:09+5:302021-08-01T04:24:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाने माणसाचा श्वास ज्यापद्धतीने कोंडला त्याचपद्धतीने आर्थिक घडी विस्कळीत करुन जगण्यासाठीच्या मार्गांचीही कोंडी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाने माणसाचा श्वास ज्यापद्धतीने कोंडला त्याचपद्धतीने आर्थिक घडी विस्कळीत करुन जगण्यासाठीच्या मार्गांचीही कोंडी केली. आता या दुष्टचक्रात फसलेल्या व्यावसायिक व सामान्य नागरिकांना घेतलेल्या कर्जाचा डोंगर डोईजड वाटू लागला आहे. हप्ता भरायला उशीर झाला तरी बँकेचा वसुलीवाला दारात येत आहे. काहींच्या दारात खासगी सावकारांचे वसुलीवालेही ठाण मांडत आहेत.
गेली दीड वर्षे कोरोनाने मुक्काम ठोकल्यानंतर अनेकांची परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. कोणी व्यवसाय बंद झाल्याने तर कोणाची नोकरी गेली म्हणून कर्ज काढण्याची वेळ सामान्यांवर आली. काहींनी नोकरी व व्यावसायाच्या जोरावर कर्जे काढली होती. आता हे स्त्रोतच थांबल्याने हप्ते भरायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
चौकट :
सारीच कर्जे थकीत, गृहकर्जाचे प्रमाण अधिक
कोरोना काळात गृह कर्ज, व्यावसायिक, औद्योगिक कर्ज, शेती कर्ज, वाहन कर्ज अशा विविध कर्जांच्या थकबाकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बँकांकडील थकबाकी वाढत असली तरी यात सर्वाधिक गृह व व्यावसायिक कर्जाची थकबाकी दिसत आहे.
ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, छोटे व्यवसाय बंद झाले अशांना गृहकर्ज फेडताना अडचणी अधिक आहेत.
चौकट
नोटीस, जप्तीची कारवाई सुरु
सांगलीत काही व्यापाऱ्यांच्या दुकानांवर आता मालमत्ता जप्तीच्या नोटीस चिकटविण्यात आल्या आहेत. काहींना कागदी नोटीस धाडण्यात आल्या आहेत. एरवी ज्या व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी बँका मागे लागत होत्या, त्यांच्याकडे आता पैशासाठी तगादा लावण्यात आला आहे.
कोट
हप्ते भरण्यासाठी उसनवारीची वेळ
नोकरी गेल्यानंतर माझ्यासारख्या काही लोकांनी व्यवसाय सुरु केला, मात्र कोरोना काळात तो बंद आहे. उत्पन्नाचे स्त्रोतच बंद असल्याने आता बँकांचे हप्ते व इतर खर्च भागवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- राहुल पाटील, मिरज
कोट
तीन महिनेच नव्हे, तर दीड वर्षांपासून सातत्याने व्यावसाय बंद होत आहे. आर्थिक घडी विस्कळीत झाल्यानंतर आता बँकेचे हप्ते भरताना कसरत करावी लागत आहे. प्रसंगी हप्त्यांसाठी उसनवारी करण्याची वेळ आली आहे.
- दत्ता जाधव, सांगली
चौकट
दुकान बंद पडले पैसे कसे भरणार
गेले साडेतीन महिने दुकाने बंद आहेत. महापुरातही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशास्थितीत आम्ही बँकांचे हप्ते, कर कसे भरणार, याचा विचार तरी शासनाने करायला हवा.
- समीर शहा, अध्यक्ष, व्यापारी एकता असोसिएशन
कोट
घरातील साहित्य विकून आता बँकांचे हप्ते, कर फेडण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. उत्पन्नाचे स्त्रोत आटले असताना आम्ही बँकेचा हप्ता, शासनाचे कर, वीज, पाणी बिल भरायचे कुठून, याचे उत्तर शासनानेच द्यावे.
- सागर सारडा, व्यापारी, सांगली
चौकट
थकीत कर्जाबाबत बँक अधिकारी म्हणतात...
काेट
रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईनप्रमाणे जे कर्जदार मार्च २०२१पर्यंत नियमित हप्ते भरत होते, त्यांना हप्ते भरण्यास सवलत देता येते. त्यामुळे आम्ही अशा व्यावसायिक, औद्योगिक कर्जदारांना हप्ते भरण्यास सवलतही देत आहोत.
- जयवंत कडू-पाटील, सीईओ, सांगली जिल्हा बँक
कोट
कोरोना काळात व्यावसायिक, उद्योजक अडचणीत आहेत, ही गोष्ट खरी आहे. रिझर्व्ह बँकेने ५ मे २०२१ला दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनापूर्वी नियमित असलेल्या कर्जदारांना हप्ते भरण्यास सवलती देण्यात येत आहेत.
- डी. व्ही. जाधव, मुख्य प्रबंधक, अग्रणी बँक, सांगली