जाडरबोबलादमध्ये भाजप-कॉँग्रेसमध्येच सामना
By admin | Published: January 15, 2017 11:36 PM2017-01-15T23:36:51+5:302017-01-15T23:36:51+5:30
खुला मतदारसंघ; इच्छुक वाढले : उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी निश्चित, जोरदार रस्सीखेच
मच्छिंद्र बाबर ल्ल माडग्याळ
जाडरबोबलाद (ता. जत) येथील जिल्हा परिषद गट यावेळी खुला झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. जाडरबोबलाद गण व माडग्याळ गणात राजकीय पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ आल्याचे सध्याचे चित्र आहे. या मतदार संघात भाजप विरुध्द कॉँग्रेस अशी लढत असली तरी, पक्षाकडून उमेदवार न मिळाल्यास बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यताही आहे.
या मतदारसंघात जि. प. साठी सध्या आठजण आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी रस्सीखेच आहे. त्यामध्ये भाजपच्यावतीने माजी जि. प. सदस्य बसवराज बिरादार, माजी. पं. स. सदस्य सोमण्णा हक्के, बाजार समितीचे संचालक विठ्ठल निकम, जाडरबोबलादचे विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष तम्मणगौंडा रवी-पाटील, गुड्डापूरचे माजी सरपंच अशोक पुजारी, तर कॉँग्रेसच्यावतीने बाजार समिती संचालक संतोषगौडा पाटील, जत साखर कारखान्याचे माजी संचालक सदाशिव माळी, उटगीचे सरपंच भीमराव बिरादार आदी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपतर्फे बसवराज बिरादार आणि कॉँग्रेसतर्फे सदाशिव माळी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून, इतर दोन्ही पक्षातील इच्छुक पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या मागे खंबीरपणे राहणार असल्याचे बोलत असले तरी, नाराज गट बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जाडरबोबलाद पंचायत समिती गण मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असून, या गणामध्ये उटगी, सोन्याळ, जाडरबोबलाद, लकडेवाडी, लमाणतांडा आदी गावांचा समावेश असून, या गणात सुशिक्षित महिला उमेदवार मिळविण्यासाठी कॉँग्रेस व भाजपला चाचपणी करावी लागणार आहे. कॉँग्रेसतर्फे सोन्याळच्या महादेवी कांबळे, उटगीच्या सुनंदा सन्नोळी यांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपच्यावतीने पुन्हा विद्यमान जि. प. सदस्या सौ. सुशिला होनमोरे यांनाच मैदानात उतरविण्याची तयारी कार्यकर्ते करीत आहेत.
माडग्याळ पंचायत समिती गण मागासवर्गीय पुरुषांसाठी राखीव झाला असून, या गणात माडग्याळ, कुलाळवाडी, गड्डापूर, व्हसपेठ, अंकलगी आदी गावांचा समावेश आहे. या गणात सध्या कॉँग्रेसतर्फे माडग्याळचे सरपंच सुरेश ऐवळे, व्हसपेठचे गोपाल सर्जे यांच्या नावांची चर्चा आहे, तर भाजपच्यावतीने अशोक हुवाळे, तम्मा चव्हाण हे इच्छुक आहेत.
जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटात आगामी जि. प. निवडणुकीसाठी भाजप व कॉँग्रेस पक्षात जोरदार चुरस निर्माण होण्याची शक्यता असून, उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वचजण कामाला लागले आहेत. प्रत्येक इच्छुक तालुका आणि जिल्ह्यातील नेत्यांकडे संपर्क ठेवून आहेत. पंचायत समिती गणासाठी निवडणूक जास्त महत्त्वाची नसून, जिल्हा परिषद गटात मात्र मोठी चुरस आहे.
या मतदार संघात लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे. त्याखालोखाल धनगर समाज आहे. ज्या समाजाची मते जास्त आहेत, त्या समाजाचा उमेदवार देण्यावर राजकीय पक्षांचा भर राहील. तसे झाल्यास धनगर समाज इतर सर्व समाज एकत्र करुन स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची दाट शक्यता आहे.
जाडरबोबलाद जि. प. गट खुला आहे. या गटात खुल्या वर्गातील उमेदवारांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी माडग्याळ पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी जि. प. सदस्य कृष्णदेव गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करुन, खुल्या जागेवर खुल्या वर्गातील उमेदवारांनाच संधी द्या व आरक्षण असलेल्या ठिकाणी आरक्षितांना संधी द्या, खुल्या वर्गावर इतर उमेदवार लादू नका, असे त्यांचे म्हणणे आहे. जसे मागासवर्गीय व इतर आरक्षित जागेसाठी खुला उमेदवार चालत नाही, तसे खुल्या गटावरही इतर उमेदवारांना उभे राहण्यास संधी नाकारावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खुल्या वर्गावर होणारा अन्याय सहन करणार नसल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे स्थान या मतदार संघात मात्र सद्यातरी नगण्य आहे.