मिरजेत आर्थिक विवंचनेतून जाेडप्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:15+5:302021-04-28T04:29:15+5:30
मिरज : आर्थिक विवंचनेतून मिरजेतील खॉंजा बस्ती येथे जाेडप्याने गळफास लावून आत्महत्या केली. लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने त्यांनी ...
मिरज : आर्थिक विवंचनेतून मिरजेतील खॉंजा बस्ती येथे जाेडप्याने गळफास लावून आत्महत्या केली. लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.
खॉंजा वसाहतीत राहणारे सलिम गाैससाहेब सय्यद ऊर्फ भटकळ (वय ४७) व मरियम बशीर नदाफ (वय ४०) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सलीम हा रेल्वे स्थानक परिसरात पानपट्टीत काम करत होता. रेल्वेत चहा विक्री व मिळेल ते काम करत होता. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. मरियम काही दिवसांपासून आजारी होती. बचतगटाचा कर्जाचा हप्ता थकीत होता. घराचा खर्च चालविणे कठीण झाल्यामुळे सलीम निराश होता.
मंगळवार बचत गटाचा हप्ता भरण्याचा दिवस असल्याने सलीमने काही जणांकडून उसनवार पैसे मिळविण्याचाही प्रयत्न केला; मात्र कोणाकडूनही पैसे मिळाले नसल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. मंगळवारी दोघांनीही घरात गळफास लावून आत्महत्या केली. घरातील छोट्या खोलीत सलीम हा दोरीला लटकला होता. तर मरियम मृतावस्थेत जमिनीवर पडली होती. मरियमने प्रथम आत्महत्या केल्यानंतर सलीमने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे रोजगार बंद असल्याचा गरीब जाेडप्यास फटका बसल्याची चर्चा हाेती. अर्थिक विवंचनेतून दोघांनी आत्महत्या केल्याच्या या घटनेबाबत तपास सुरू असल्याचे गांधी चाैक पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.
चाैकट
उपचारासाठीही पैसे नव्हते
कर्नाटकातील भटकळ येथून दहा वर्षांपूर्वी मिरजेत आलेल्या सलीम याच्यासोबत विधवा मरियम नदाफ सहा महिन्यापासून एकत्र रहात होती. मरियम ही गेली काही दिवस आजारी होती. तिच्या उपचारासाठीही सलीमकडे पैसे नव्हते. अशीही माहिती मिळाली.