Sangli: वडाच्या झाडावर विसावले गणपती बाप्पा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:35 PM2024-09-13T12:35:29+5:302024-09-13T12:35:50+5:30
१५ वर्षांपासून गुंडेवाडी (ता. मिरज) येथील जय हनुमान गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
मिरज (जि.सांगली) : गुंडेवाडी (ता. मिरज) येथील जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने वडाच्या झाडावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. वृक्षतोड थांबवून पर्यावरणाच्या संवर्धनाची संस्कृती ग्रामस्थांत रुजावी यासाठी गेल्या १५ वर्षांपासून मंडळ हा उपक्रम राबवत आहे.
डीजेमुक्त गणेशोत्सव, एक गाव, एक गणपती उपक्रम, झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश मंडळ देत आहे. हा वेगळा उपक्रम पंचक्रोशीच्या आकर्षणाचा विषय बनविला आहे. वडावरच्या गणेशाच्या पूजेसाठी ग्रामस्थ गर्दी करतात. दररोज सकाळी व सायंकाळी आरतीला गावकरी एकत्र येतात.
पाच हजार लोकवस्तीच्या या गावात गावातील तरुणांनी एकत्र येऊन ही अफलातून संकल्पना राबविली आहे. मंडप, सजावट, रोषणाई असा खर्च न करता वडाच्या झाडालाच गणेशाचे पूजास्थान बनविले. दोन फांद्यांच्या बेचक्यात जमिनीपासून २० फूट उंचावर मूर्तीचा स्थापना केली आहे.
गणेशोत्सव काळात दररोज हलगीच्या तालावर लेझीमसह पारंपरिक खेळ खेळले जातात. आरतीसाठी दोन कार्यकर्ते शिडीवरून झाडावर चढतात.