‘जय जय रघुवीर समर्थ’ नामाचा जयघोष...

By Admin | Published: February 20, 2017 11:49 PM2017-02-20T23:49:31+5:302017-02-20T23:49:31+5:30

३३५ वा दासनवमी महोत्सव : सज्जनगडावर राज्यभरातील भाविकांची हजेरी; लळिताच्या कीर्तनाने आज सांगता होणार

'Jai Jai Raghuveer Samarth' Nama Praise! | ‘जय जय रघुवीर समर्थ’ नामाचा जयघोष...

‘जय जय रघुवीर समर्थ’ नामाचा जयघोष...

googlenewsNext



सातारा : सज्जनगड, ता. सातारा येथे श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने दासनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा हा ३३५ वा दासनवमी उत्सव होता. श्री समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थानच्या वतीने महोत्सवात दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन, संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. भारतातील नामवंत कलाकारांनी आपली कला महोत्सवाच्या निमित्ताने समर्थ चरणी अर्पण केली. सज्जनगडावर ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष झाला.
दरम्यान, मंगळवारी लळिताच्या कीर्तनाने सांगता होणार आहे,
यंदा राज्यातून दासनवमी उत्सव काळात लाखापेक्षा जास्त संख्येने भाविक गडावर दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी आले होते. समर्थ रामदास स्वामींच्या ३३५ व्या पुण्यतिथी निमित्त तेर, मिरज येथून शेकडो समर्थ भक्त आले होते. तसेच पायी दिंड्याही सज्जनगडावर आल्या होत्या.
दासनवमी उत्सवानिमित्त पहाटे दोन वाजता काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे ४ वाजता समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस रामदास स्वामींचे वंशज, अधिकारी व अध्यक्ष अभिराम अयोध्यानाथ स्वामी व समर्थ भक्तांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर ६.३० ते १० वाजेपर्यंत गडावर सांप्रदायिक भिक्षेचा कार्यक्रम झाला. सकाळी १० ते ११ यावेळेत पारंपरिक पोशाखातील मानकरी तसेच छत्र, चामर, दंड, आबदागिऱ्या, शिंग तुताऱ्यांच्या निनादात छबिना काढण्यात आला. ११.३० ते १२ या वेळेत समर्थ समाधी मंदिरास समर्थ वंशज तसेच अधिकारी स्वामी आणि पदाधिकारी तसेच हजारो समर्थ भक्तांनी १३ प्रदक्षिणा घालून समर्थांच्या नावाचा ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जय जयकार केला.
दुपारी १२ ते १२.३० या वेळेत निर्वाण कथेचे वाचन करण्यात आले. रामायण वाचनानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप असा कार्यक्रम झाला. गडावर ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी रात्रीपासूनच गडावर मोठी गर्दी केली असल्याने क्लोज सर्किट टीव्हीच्या माध्यमातून भाविकांना महापूजेचे दर्शन घडविण्यात येत
होते. सोमवारी सकाळी आठवडाभर चालेल्या सामुदायिक दासबोध वाचनाची सांगता नितीन बुवा रामदासी व रसिकाताई ताम्हणकर यांनी केली. या पारायण सोहळ्यात १५० हून अधिक समर्थ भक्त सहभागी झाले होते.
दासनवमी उत्सवाची सांगता दि. २१ फेब्रुवारी रोजी लळिताच्या कीर्तनाने होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष अभिराम स्वामी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jai Jai Raghuveer Samarth' Nama Praise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.