मानधनवाढीसाठी सांगलीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:46 PM2017-10-06T15:46:17+5:302017-10-06T15:46:41+5:30
सांगली, दि. ६ : मानधन वाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांच्यावतीने गुरुवारी सांगलीत जिल्हा परिषदेसमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधीगिरीने सुरू असलेले हे आंदोलन लवकरच क्रांतिसिंहांच्या चळवळीसारखे जहाल होईल, असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिला.
मानधन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणा देत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभेचे नेते बिराज साळुंखे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अॅड. के. डी. शिंदे, जिल्हाध्यक्ष ललिता चौगुले, रेखा पाटील आदी उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन नको, वेतन हवे, कृती समितीच्या ज्येष्ठतेनुसार व आराखड्यानुसार मागण्या शासनाने मान्य कराव्यात, भाऊबीज मानधनाएवढी असावी, आजारपणाची रजा असताना मानधन मिळावे, एक महिन्याची उन्हाळी सुटी मिळावी, मानधन दरमहा वेळेत मिळावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या काही महिलांना अटक केली.
प्रा. शरद पाटील म्हणाले, शासनाच्या आडमुठेपणामुळे अंगणवाडी सेविकांवर संपाची वेळ आली आहे. या संपामुळे लहान मुले, कुपोषित बालके, गर्भवती महिलांच्या पोषण आहाराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
या खात्याचा कारभार एका अपरिपक्व महिलेकडे आहे. त्यांनी या महिलांच्या समस्यांकडे सहानुभूतीने पाहणे गरजेचे आहे. मात्र राज्य शासनाकडून तसे होताना दिसत नाही. या आंदोलनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे जबाबदार आहेत. या गोष्टीचा आम्ही जनता दलाच्यावतीने तीव्र निषेध करीत आहोत.
आंदोलनाला जनतेतून पाठिंबा : बिराज साळुंखे
यावेळी बिराज साळुंखे म्हणाले, अंगणवाडी कर्मचाºयांच्या या आंदोलनाला जनतेतून पाठिंबा आहे. शिस्तबध्द पध्दतीने आंदोलन सुरू आहे. तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही. त्यामुळे यापुढे आणखी तीव्र आंदोलन करावे लागेल.
अन्यथा क्रांतिसिंहांचा मार्ग अवलंबणार : के. डी. शिंदे
शासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात. आतापर्यंत गांधींनी शिकविलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. पण शासन जर का असेच वागत राहिले, तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री ठोकण्याच्या आंदोलनाला सुरुवात करावी लागेल, असा इशारा अॅड. के. डी. शिंदे यांनी दिला.