कारागृह, आरटीओ कार्यालय कवलापूरलाच...

By admin | Published: August 5, 2016 12:58 AM2016-08-05T00:58:16+5:302016-08-05T02:01:56+5:30

स्थलांतरावर शिक्कामोर्तब : विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य शासनाकडे; निधी मिळण्याचे संकेत

Jail, RTO office is only in Kawalapur ... | कारागृह, आरटीओ कार्यालय कवलापूरलाच...

कारागृह, आरटीओ कार्यालय कवलापूरलाच...

Next

सचिन लाड-- सांगली --जिल्हा मध्यवर्ती कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालये कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर स्थलांतर करण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवालही मागवून घेतला आहे. येत्या काही महिन्यात शासकीय कार्यालयांना जागेचे वाटप करून इमारत बांधकामास निधी मिळण्याचे संकेत आहेत.
कवलापूर येथे नियोजित विमानतळाची दीडशे एकर जागा आहे. याठिकाणी विमानतळ करण्याचा राज्य शासनाने दोनवेळा निर्णय घेतला. दोनवेळा उद्घाटनही केले; पण शेती जाणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. अगदी हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यानंतर शासनाने नमते घेत विमानतळ करण्याचा निर्णय रद्द केला. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीक आहे. सांगलीत अनेक शासकीय कार्यालये अडगळीच्या ठिकाणी आहेत. त्यांना स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी जागाही नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने खचाखच भरले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने हे कारागृह शहरातून हलविण्याची गरज आहे. यासाठी कारागृह प्रशासनाने कवलापुरातील जागेची मागणी केली होती. आरटीओ कार्यालयही भाड्याच्या जागेत आहे. त्यांनीही ३२ एकर जागा देण्याची मागणी केली. त्यानंतर अन्य शासकीय कार्यालयांनीही याच जागेला पसंती दिली.
कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालयांनी कवलापुरातील जागेची मागणी करून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना प्रस्ताव सादर केला होता. गायकवाड यांनी हा प्रस्ताव पुढे राज्य शासनाला सादर केला होता. शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनीही अहवाल सादर केला आहे.
अहवालात काय म्हटले आहे, हे समजू शकले नाही. पण ज्या शासकीय कार्यालयांनी जागेची मागणी केली आहे, ती त्यांना देण्यासाठी शासनाने शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. शासनाकडून भविष्यात ही जागा मिळू शकते. अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे. पण त्यांची ताकद कमी पडते. लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करण्याची गरज आहे.


कारागृहाला गरज जागेची
जागेची सर्वात जास्त गरज कारागृहाला आहे. सध्या कारागृहात चारशेहून अधिक कैदी झाले आहेत. त्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सत्तरहून अधिक कैदी कळंबा व येरवडा कारागृहात हलविले आहेत. अन्यथा येथे पाचशेपेक्षा जादा कैदी झाले असते.

Web Title: Jail, RTO office is only in Kawalapur ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.