जैन संघटना करणार ५१०० युवतींचे सक्षमीकरण : इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:30 AM2020-01-15T00:30:25+5:302020-01-15T00:33:35+5:30
ते म्हणाले की, युवती सक्षमीकरण प्रकल्पातून सांगली जिल्ह्यातील आठवी ते अकरावीमध्ये शिकणाऱ्या ५१०० मुलींना सक्षम बनविण्यासाठी १०० वर्गात १६ ते २२ जानेवारी या कालावधित कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे.
सांगली : सोशल मीडिया, चित्रपट, पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण यांचा प्रभाव पडल्याने आठवी ते अकरावी या वयोगटातील मुली, युवती संभ्रमाच्या कुंपणावर असतात. प्रशिक्षणातून त्यांचे मानसिक सक्षमीकरण करण्याचा उपक्रम भारतीय जैन संघटनेने हाती घेतला आहे. याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे, अशी माहिती माजी महापौर सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, युवती सक्षमीकरण प्रकल्पातून सांगली जिल्ह्यातील आठवी ते अकरावीमध्ये शिकणाऱ्या ५१०० मुलींना सक्षम बनविण्यासाठी १०० वर्गात १६ ते २२ जानेवारी या कालावधित कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेमार्फत २००८ पासून महाराष्टÑ व देशात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुली व पालक यांच्यासाठी दोन दिवस कार्यशाळा घेतली जाते. या कार्यशाळेत स्वयंजागृती, संवाद आणि नातेसंबंध, स्वसंरक्षण, निवड व निर्णय, मैत्रभाव अशा अनेक गोष्टींविषयी मार्गदर्शन करण्यात येते. मोहापासून लांब कसे रहायचे, आयुष्यातील उद्दिष्ट कसे गाठायचे, कुटुंबीयांशी कसा सुसंवाद ठेवायचा, याविषयीसुद्धा चर्चा केली जाते. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून मुलींमधील सकारात्मक बदल पालकही अनुभवत आहेत. ज्या वयात मन विचलित होत असते, त्या वयातच मुली व युवतींना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याची ही योजना आता गतीने सुरू झाली आहे.
पाटील म्हणाले की, २२ ते २४ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय मूल्यवर्धनाविषयी कल्पदु्रम क्रीडांगणावर पोस्टर प्रदर्शन होणार आहे. जैन संघटनेच्या माध्यमातून शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनतर्फे मूल्यवर्धन कार्यक्रमही हाती घेतला आहे.
महाराष्टÑातील ६७ हजार शाळांमध्ये तो सुरू आहे. शालेय विद्यार्थी भविष्यात जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये रुजविण्यात येत आहेत. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी अर्चना मुळे उपस्थित होत्या.
- जिल्ह्यातही मूल्यवर्धन कार्यक्रम
सांगली जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांत क्रमा-क्रमाने मूल्यवर्धन उपक्रम राबविताना १६०९ जिल्हा परिषद शाळांमधील सहा हजार शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पहिली ते पाचवीमधील सर्व तालुक्यातील एक लाख विद्यार्थिनींना प्रतिवर्षी याचा लाभ होत असल्याची माहिती फाऊंडेशनचे सांगली शाखाप्रमुख राजगोंडा पाटील यांनी दिली.
- सोशल मीडियाचा प्रभाव
प्रशिक्षक दीपक पाटील यांनी सांगितले की, घरातच अनेक मुली असुरक्षित असल्याची बाब प्रशिक्षणातून निदर्शनास आली. अशा मुलींनाही आम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम बनविले आहे. सोशल मीडिया आणि पाश्चात्य संस्कृतीचा चुकीचा प्रभाव मुलींवर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून आखलेल्या या उपक्रमातून मुलींना योग्य दिशा मिळत आहे.