जैन संघटनेमार्फत जिल्हयातील १२३ गावे पाणीदार : सुरेश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 08:41 PM2018-06-09T20:41:16+5:302018-06-09T20:41:16+5:30
सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा
सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा विक्रम केला आहे. सांगली जिल्'ातील १२३ गावात ३५० कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे, अशी माहिती दुष्काळमुक्त अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व माजी महापौर सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, जैन संघटनेने शांतिलाल मुथा आणि पानी फौंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले. राज्यातील दीड हजार गावांमध्ये एकूण १,६२४ यंंत्रांचा वापर करण्यात आला. स्पर्धा २२ मे रोजी संपली आहे. त्यावेळी तीनशेहून अधिक गावांना श्रमदान करुन यंत्रेही मिळू शकली नाहीत. जैन संघटनेने अशा गावांना यंत्रे पुरवून प्रोत्साहित केले. यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यातूनही यंत्रे पुरवण्यात आली.
संघटनेने यंत्रे जरी पुरवली असली तरी, यात श्रमदान करणारे नागरिक, नागरिकांच्या गावाच्या पाठीशी असणारे शासन, स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्यामुळे हे अभियान यशस्वी होत आहे. शासनाने प्रत्येक गावाला दीड लाख रुपये डिझेलसाठी मंजूर केले. श्रमदान करणाऱ्या गावाला हे अनुदान मिळाले आहे.
गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले आहे. दरवर्षी हजारो टँकरने पाणीपुरवठा केला जातो, जनावरांसाठी चारा छावण्या निर्माण कराव्या लागल्या. या दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी जैन संघटना आणि पानी फौंडेशन यांनी मिळून दुष्काळमुक्त अभियान राबवले. या अभियानाअंतर्गत सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्हयात मोठे काम झाले आहे. सातारा, सोलापूर आणि सांगली हे कामाच्याबाबतीत राज्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानावर आहेत. २ लाख ९८ हजार तास यंत्राच्या माध्यमातून १८० लाख घनमीटर काम करण्यात आले. सांगली जिल्ह्यात ५८ हजार ५६० तास यंत्राचे काम झाले आहे. यातून ३५लाख घनमीटर काम व साडेतीनशे कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे. यावेळी अभियानाचे समन्वयक राजगोंडा पाटील उपस्थित होते.
जिल्हयात मदतीची अपेक्षा
सातारा जिल्हयात ज्यापद्धतीने शरद पवारांच्या प्रयत्नामुळे विविध बॅँका व संस्थांकडून या चळवळीला मदत झाली, तेवढी मदत सांगली जिल्ह्यातून झाली नाही, असे पाटील म्हणाले.