शेतकरी संघटनेचे नेते जयपाल फराटे यांचे निधन, आयुष्यभर संघटनेशी एकनिष्ठ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:50 PM2023-06-20T13:50:22+5:302023-06-20T15:45:15+5:30
विदर्भ-मराठवाड्यात असणारी शरद जोशी यांची शेतकरी संघटना ऊस आंदोलनाद्वारे पश्चिम महाराष्ट्रात रुजवण्यात जयपालअण्णांचा मोठा वाटा
कसबे डिग्रज (जि.सांगली) : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी स्थापना केलेल्या शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष जयपाल सिद्धाप्पा फराटे (वय ८६, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) यांचे सोमवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
‘जयपालअण्णा’ या नावाने ते परिचित होते. विदर्भ-मराठवाड्यात असणारी शरद जोशी यांची शेतकरी संघटना ऊस आंदोलनाद्वारे पश्चिम महाराष्ट्रात रुजवण्यात जयपालअण्णांचा मोठा वाटा होता. शेतकरी संघटनेच्या सांगलीतील अधिवेशनात शरद जोशी यांनी त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्या काळात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. ऊस दर आंदोलनात मौजे डिग्रज येथे पोलिसांनी आंदोलकांना केलेल्या मारहाणीचा प्रश्न त्यांनी उचलून धरला होता. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते.
माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, वामनराव चटप, पाशा पटेल आदी शेतकरी संघटनेचे नेत्यांमध्ये जयपालअण्णांना मोठा मान होता. संघटनेत ते कार्यरत असताना त्यांना विविध पक्षांकडून पदांची आमिषे दाखविण्यात आली होती, पण शेतकरी संघटनेच्या विचारांपासून ते कधीच दूर गेले नाहीत. आयुष्यभर ते संघटनेशी एकनिष्ठ राहिले.