जयपूर, दिल्लीप्रमाणे मिरजेत संगीत महोत्सव सुरू व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:07+5:302021-09-24T04:31:07+5:30
फोटो ओळ : मिरजेत तंतुवाद्य कारागीरांच्या चर्चासत्रात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे रितेश तिवारी यांनी स्वागत ...
फोटो ओळ : मिरजेत तंतुवाद्य कारागीरांच्या चर्चासत्रात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे रितेश तिवारी यांनी स्वागत केले. तंतुवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मुबिन मिरजकर, अल्ताफ पिरजादे उपस्थित होते.
मिरज : मोठी संगीत परंपरा असलेल्या मिरजेत जयपूर व दिल्लीप्रमाणे संगीत महोत्सव सुरू व्हावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.
मिरजेतील तंतुवाद्य निर्माते कारागीरांसाठी हस्तकला मंडळ व सोलट्यून संगीतवाद्य उत्पादक कंपनीतर्फे दोनदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी जितेंद्र डुडी बोलत होते. यावेळी त्यांनी दिग्गज गायक-वादकांची कर्मभूमी असलेल्या मिरजेत देशपातळीवरील संगीत महोत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हा परिषदेकडून सहकार्याचे आश्वासन दिले. चर्चासत्रात तंतुवाद्य कारागीरांचे प्रश्न व त्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
डिजिटल मार्केटिंगबाबत अनिल पाटील, तंतुवाद्यांचे ब्रॅंडिंग व पॅकेजिंग जाहिरात मार्केटिंगबाबत दत्तात्रय मुळे, मुद्रा लोन व आर्थिक व्यवस्थापनाबाबत रायेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. भाैगोलिक ओळखबाबत (जीआय) डाॅ. रजनीकांत यांनी ऑनलाईन माहिती दिली. सोलट्यून संगीतवाद्य उत्पादक कंपनीतर्फे दोनदिवसीय चर्चासत्रास कोल्हापूर विभागाचे हस्तकला मंडळाचे चंद्रशेखर सिंह, रितेश तिवारी, एस के. चव्हाण, तंतुवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, अल्ताफ पिरजादे, हैदर सतारमेकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर हस्तकला मंडळ व सोलट्यून संगीतवाद्य उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मुबीन मिरजकर यांनी संयोजन केले.