जालन्यातील लाठीहल्याचा निषेध: सांगली जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद
By शरद जाधव | Published: September 7, 2023 11:25 AM2023-09-07T11:25:57+5:302023-09-07T11:27:06+5:30
सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह जालना येथील लाठीहल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ...
सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह जालना येथील लाठीहल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच सांगली शहर आणि इतर भागातील संपूर्ण व्यवहार बंद आहेत. सांगली शहरात मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सांगली शहरातील सर्व व्यवहार व वाहतूक बंद होती. पोलिसांकडून सर्व चौकात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इस्लामपूर, विटा, जत आणि आटपाडी येथील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. वैद्यकीय मदत मिळवण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
इस्लामपुरात सगळीकडे शुकशुकाट; सर्व व्यवहार ठप्प
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील सर्व समाज बांधवांनी कडकडीत बंद पाळला. मुख्य बाजार पेठेसह बसस्थानक रस्ता, डॉ. आंबेडकर मार्ग, आझाद चौक, गांधी चौक, लाल चौक, गणेश भाजी मंडई, यल्लमा चौक, कचेरी चौक, महावीर चौक, जयहिंद चित्रमंदिर परिसर, मुख्य भाजी बाजार अशा सगळ्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. येथील एस.टी. आगारातून परिस्थिती पाहून बस सोडण्यात येत होत्या. कोल्हापूर आणि कराड मार्गावरील सेवा सुरू होती. त्यानंतर ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.
शिराळा शहर, तालुका कडकडीत बंद
शिराळा : शिराळा शहर आणि तालुक्यात जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काही गावांमध्ये या अगोदर बंद पाळण्यात आल्याने याठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. एस टी वाहतूक ही बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी संघटनांमार्फत तहसीलदार शामला खोत पाटील यांना निवेदन देण्यात आले.