सागावमध्ये मुलीच्या जन्माने जल्लोषी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:10+5:302021-04-22T04:26:10+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मुलगा हाच वारसदार, त्यामुळे मुलगा झाला की त्याचे घरी मोठ्या थाटामाटात स्वागत ...
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : मुलगा हाच वारसदार, त्यामुळे मुलगा झाला की त्याचे घरी मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते. मात्र, सागाव ( ता. शिराळा) सारख्या डोंगरी भागात मुलीचा जन्म झाला व घरी तिचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. हे कुटुंब आहे उपसरपंच सत्यजित पाटील यांचे. त्यांनी त्यांच्या दोन महिन्यांच्या मुलीचे केलेले स्वागत लक्षवेधी ठरले.
उपसरपंच पाटील यांची सासरवाडी सागावमध्येच आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी मुलगी झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रियांका व कन्या यांना माहेरीच ठेवले होते. पाटील यांनी पत्नी व कन्या यांना घरी आणताना एक दिवस अगोदर घर ते मुख्य चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रांगोळीतून सुरक्षा संदेश रेखाटून प्रबोधन व फुलांची सजावट केली. त्यांनी मुलीच्या स्वागतासाठी केलेली ही तयारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
मुलीला घरामध्ये येताना कुंकवामध्ये पाय बुडवून लक्ष्मीच्या पावलाने घरात प्रवेश केला. पाटील यांना गेल्या पाच वर्षांपूर्वी मुलगा झाला. त्यावेळीदेखील त्यांनी मुलाचे स्वागत जेवढ्या दिमाखात केले, तसेच स्वागत व आनंदोस्तव त्यांनी मुलगी झाल्यानंतरही केला. मुलगा मुलगी दोन्ही आजच्या घडीला समान असून, त्यांचे योग्य पालनपोषण व सुसंस्कार केले तर भविष्यात कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतील. आज मुलांच्या बरोबरीने मुलीही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी मुलगी झाली म्हणून नाराज न होता. तिचेदेखील आपण मोठ्या जबाबदारीने स्वागत करीत, तिला भविष्यात उच्च शिक्षित करण्याचा संकल्प केला पाहिजे, असाच संदेश यानिमित्ताने पाटील कुटुंबियांनी दिला आहे.