कमळाचे देठ सांगून विक्रेते सांगलीत विकायचे जलपर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 02:06 PM2021-11-13T14:06:45+5:302021-11-13T14:09:39+5:30
जळगाव परिसरातील काही फिरते विक्रेते दोन-तीन दिवसांपासून शहरात जलपर्णीचे देठ विकत आहेत. विजयनगर, तरुण भारत क्रीडांगण, वैरण अड्डा, कोल्हापूर रस्ता आदी ठिकाणी विक्री सुरू आहे. कमळाचे देठ असल्याचे सांगत जलपर्णी विकणाऱ्यांना पोलिसांनी हाकलून लावले.
सांगली : कमळाचे देठ असल्याचे सांगत जलपर्णी विकणाऱ्यांना पोलिसांनी हाकलून लावले. शहर पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पाटील यानी विक्रेत्यांना ताकीद दिली. लोकांची फसवणूक करायची नाही असे सुनावले.
जळगाव परिसरातील काही फिरते विक्रेते दोन-तीन दिवसांपासून शहरात जलपर्णीचे देठ विकत आहेत. विजयनगर, तरुण भारत क्रीडांगण, वैरण अड्डा, कोल्हापूर रस्ता आदी ठिकाणी विक्री सुरू आहे. शहरात पानथळ जागेवर अनेक ठिकाणी जलपर्णीचे बेटे माजली आहेत. ती तोडून स्वच्छ केली जातात. देठांच्या दोन्ही टोकांना आकर्षक रंग दिले जातात. नंतर कमळाचे देठ म्हणून दहा-वीस रुपयांना विकले जाते. लोकांना फसविण्यासाठी कमळाच्या फुललेल्या फुलांची चित्रे दाखविली जातात. आठवडाभरात विक्रेते मुक्काम हलवतात. कुंडीत लावलेली जलपर्णी तोपर्यंत कुजून जाते, किंवा वाढल्यानंतर ते कमळाचे रोप नसल्याचे ध्यानी येते. त्यामुळे लोक गटारात फेकून देतात. हीच जलपर्णी गटारात किंवा नदीत फैलावते.
काही पर्यावरणप्रेमींना शुक्रवारी सकाळी हे विक्रेते दिसले. त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. सहायक निरीक्षक पाटील यांनी विक्रेत्यांना प्रतिबंध केला. विक्रेत्यांनी जलपर्णीचे देठ कचऱ्यात फेकून दिले. लोकांनी फसून पाण्याच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरू नये, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.