जनसुराज्य-रयत क्रांती एकत्र! राजकीय हालचाली गतिमान : उमेदवार देण्यासाठी तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:58 PM2019-03-15T23:58:53+5:302019-03-16T00:01:26+5:30
हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी मातोश्रीवर धडक मारली आहे. परंतु अद्यापही त्यांना यश आलेले नाही. खोत यांचा विचार झाला नाही तर विधानसभेला
अशोक पाटील ।
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी मातोश्रीवर धडक मारली आहे. परंतु अद्यापही त्यांना यश आलेले नाही. खोत यांचा विचार झाला नाही तर विधानसभेला जनसुराज्य पक्ष आणि रयत क्रांती संघटना एकत्रित येऊन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या मोजक्या जागा लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांनी दोनवेळा विजय मिळवला आहे. आताही हातकणंगलेची जागा काँग्रेस आघाडीकडून खासदार शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. शेट्टी यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेकडून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी समर्थक करत आहेत.
गेल्या वर्षभरापासून खोत यांनी मतदारसंघात दौरे केले आहेत. खासदार शेट्टी यांच्याविरोधात वारणा समूहाचे नेते विनय कोरे यांनी लढावे, यासाठीही खोत यांनी प्रयत्न चालविले होते. परंतु कोरे यांनी याला स्पष्टपणे नकार दिला. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. त्यातूनच आता कोरे यांनी खोत यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे.
कोरे यांच्या विधानसभा मतदारसंघात खोत यांनी विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. यामुळे हातकणंगले मतदारसंघात रयत क्रांती आणि जनसुराज्य पक्ष एकत्रितपणे दिसू लागले आहेत. लोकसभेला जमले नाही, तर दोन्ही पक्षांचे अस्तित्व टिकविण्यासाठी विधानसभेला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मोजक्या जागा लढविण्याबाबत खोत आणि कोरे यांच्यात खलबते सुरू झाली आहेत.
हातकणंगलेतून खा. राजू शेट्टी यांच्याविरोधात रयत क्रांती संघटना निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. परंतु युतीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वारणा खोऱ्यात विनय कोरे यांनी सहकाराच्या माध्यमातून मोठी ताकद उभी केली आहे. आमचेही कार्यकर्ते या भागात सक्रिय आहेत. त्यामुळे आम्ही मिळून विधानसभेची तयारी करणार आहोत.
- सागर खोत, युवा नेते रयत क्रांती संघटना.