कऱ्हाडच्या मंडईतील ‘जनता व्यासपीठ’ अबोल
By admin | Published: May 19, 2017 12:22 AM2017-05-19T00:22:01+5:302017-05-19T00:22:01+5:30
कऱ्हाडच्या मंडईतील ‘जनता व्यासपीठ’ अबोल
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यासह क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदी दिग्गजांच्या सभा गाजवलेले कऱ्हाडातील ‘जनता व्यासपीठ’ सध्या अबोल झाले आहे. व्यासपीठाच्या इमारतीभोवती भाजी मंडईची कोंडी झाल्याने या व्यासपीठाचा श्वास गुदमरू लागला आहे. ‘होय, मला बोलायचंय..’ असं ते म्हणतंय; पण त्याच इमारतीत असणाऱ्या पोलिसांनादेखील ते ऐकू जात नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार या व्यासपीठाला सहन करावा लागतोय.
जनतेला आपले मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून कऱ्हाडात या जनता व्यासपीठाची संकल्पना मांडली गेली. सर्वसामान्य संघटनांच्या कार्यकर्त्यांसह दिग्गज नेत्यांनीही याच व्यासपीठावरून आपली मते मांडली आणि सभा व जनता व्यासपीठ हे समीकरणच तयार झाले. पण गेल्या काही वर्षांपासून याला कोणाची दृष्ट लागली आणि मंडईचा विळखा या व्यासपीठाला जाणीवपूर्वक घालण्यात आला. आज जुनी मंडई नवी झाली तरी हा विळखा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे हे जनता व्यासपीठ मोकळा श्वास कधी घेणार, याची प्रतीक्षा कऱ्हाडकरांना लागली आहे.
जनता व्यासपीठाची इमारत कऱ्हाड पालिका इमारतीसमोर आहे. एकेकाळी याच व्यासपीठावर कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांच्या सभा व्हायच्या. पुढे सर्व राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभाही याच व्यासपीठावरून सबंध देशाने ऐकल्या व पाहिल्याही आहेत. याच ठिकाणी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी, समाजसेवक अण्णा हजारे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकेकाळी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या सभा घेतल्या होत्या. त्या सभा त्या काळात गाजल्याही.
शहरात वाढत असलेल्या भाजी विक्रेत्यांची संख्या लक्षात घेऊन पालिकेसमोरील आवारात भाजी विक्रेत्यांसाठी २०१० मध्ये शिवाजी भाजी मंडई बांधण्यात आली. मंडई इमारत बांधकामावेळी आतील व्यापाऱ्यांना बाहेरील बाजूस बसण्यास परवानगी देण्यात आली. त्यावेळी ते विक्रेते व व्यापारी बाहेर पडले. त्यांनी व्यासपीठ परिसरात आपले व्यवसाय थाटले. इमारतीचे काम पूर्ण झाले. विक्रेत्यांसाठी कट्टेही बांधून देण्यात आले आहेत. मात्र, बाहेर पडलेले विक्रेते व व्यापारी परत इमारतीत गेलेलेच नाहीत. व्यासपीठाभोवती थाटलेला व्यवसाय त्यांनी हटवलेलाच नाही. त्यातच व्यापारी व विक्रेत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मंडई इमारतीमध्ये कट्ट्यावर मोजक्याच व्यापाऱ्यांना जागा देण्यात आली. तर कांदे बटाटे विक्रेत्यांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले. ज्यांना मंडई इमारतीमध्ये जागा मिळाल्या नाहीत त्यांनी जनता व्यासपीठ इमारतीसमोर बसण्यास सुरुवात केली होती. त्या व्यापारी व भाजी विक्रेत्यांना पालिकेने तेथून हटविले आहे. मात्र, रविवार व गुरुवारी या ठिकाणी भाजी विक्रेते व व्यापारी बसत आहेत. या ठिकाणी पालिकेकडून भाजी विक्रेत्यांसाठी कट्टे व मच्छी विक्रेत्यांसाठी मच्छी मार्केट बांधून देण्यात आली आहे. मात्र, जनता व्यासपीठ इमारतीच्या डागडुजीबाबत कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. यावरून पालिकेला व्यासपीठाबाबत किती आस्था आहे, हे लक्षात येते. दिग्गज व्यक्तींचा पदस्पर्श झालेली व राजकीय घडामोडीचे साक्षीदार असलेली ही जनता व्यासपीठाची इमारत आज वापराअभावी पडून आहे. या व्यासपीठ इमारतीच्या खोलीत सध्या मंडई पोलिस चौकी आहे.
जनता व्यासपीठ नाव कसे पडले ?
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे विधानसभा, लोकसभा या निवडणुकीच्या काळात तसेच आंदोलने, मोर्चे या ठिकाणी घेतले जात असत. शहरातील नागरिक या ठिकाणी येऊन शहरातील समस्या व अडचणींविषयी चर्चा करत असल्याने या ठिकाणाला जनता व्यासपीठ असे नाव पडले, असे सांगितले जाते.
कऱ्हाड पालिकेच्या इमारतीसमोर असलेल्या जनता व्यासपीठाच्या इमारतीचे ठिकाण हे शहराच्या मध्यवस्तीत आहे. शहरातील शनिवार पेठ, पावसकर गल्ली व डॉ. आंबेडकर चौक या ठिकाणावरील रस्ते जनता व्यासपीठ परिसरात एकत्रित येतात.
जनता व्यासपीठ इमारतीच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत. दोन खांब व एकमजली असलेल्या जनता व्यासपीठाच्या इमारतीला बांधून खूप वर्षे झाली आहेत. सिमेंट अन् विटांच्या साह्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीची सध्या बिकट अवस्था झाली आहे. शिवाय झाडवेलींचा विळखाही पडला आहे.