जपानी संगीतप्रेमी शिकणार तंतुवाद्यनिर्मिती--संडे हटके बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 08:14 PM2019-07-08T20:14:00+5:302019-07-08T20:15:17+5:30
सदानंद औंधे। मिरज : मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीची कला आता जपानी संगीतप्रेमी शिकणार आहेत. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे ९ ते १९ ...
सदानंद औंधे।
मिरज : मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीची कला आता जपानीसंगीतप्रेमी शिकणार आहेत. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे ९ ते १९ जुलैदरम्यान तंतुवाद्य निर्मिती कार्यशाळेसाठी मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर व आतिक सतारमेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. जपानमधील योकोसुका, कामाकुरा, निशीनोमिया या शहरात ही कार्यशाळा होत आहे. भारतीय तंतुवाद्य निर्मितीची परदेशात होणारी ही पहिलीच कार्यशाळा आहे.
तंतुवाद्य निर्मितीसाठी मिरजेची जगात ख्याती आहे. सुमारे दीडशे वर्षे येथे तंतुवाद्य निर्मितीचा व्यवसाय सुरू आहे. मिरजेतील तंतुवाद्यांना परदेशातही मागणी आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक गायक-वादक मिरजेतील वाद्यांना पसंती देतात. भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असलेले परदेशी नागरिकही मिरजेतील वाद्यांची मागणी करतात.
मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीचा लौकिक जगभर पसरला आहे. त्यामुळे विविध देशातील संगीतप्रेमी नागरिकांना भारतीय तंतुवाद्यांविषयी कुतूहल, जिज्ञासा आहे. ही वाद्ये कशी तयार करतात, त्यांना जवारी कशी लावली जाते, यांची माहिती होण्यासाठी जपानमधील ध्रुपद सोसायटीतर्फे तंतुवाद्य निर्मितीच्या कार्यशाळेच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेमार्फत जपानमधील दोन शहरात होणाऱ्या तंतुवाद्यनिर्मिती कार्यशाळेत मिरजेतील मजीद सतारमेकर आणि आतिक सतारमेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
ध्रुपद सोसायटी अनेक वर्षे जपानमधील संगीतप्रेमींना भारतीय संगीताचे शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या प्रमुख मारिको कटसुरा उत्तम गायिका आहेत. त्या उस्ताद फरिदोद्दीन डागर आणि डॉ. ऋत्त्विक संन्याल यांच्या शिष्या आहेत. त्यांच्या सहकारी गायिका नावो सुझुकी व माकिकाटो यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
जपानी संगीतप्रेमींसाठी पर्वणी
दहा दिवसांच्या या कार्यशाळेत मजीद व आतिक सतारमेकर तंतुवाद्य कसे तयार केले जाते, त्याला तारा कशा बसवल्या जातात, विविध तंतुवाद्यांमध्ये काय फरक असतो, जवारी कशी काढली जाते, याची माहिती जपानी संगीतप्रेमींना प्रात्यक्षिकांसह देणार आहेत. गेल्या दीडशे वर्षांत तंतुवाद्यनिर्मिती परंपरेत परदेशात व जपानमध्ये होणारी ही पहिलीच कार्यशाळा असून, त्यामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद व आतिक सतारमेकर यांना मिळाला आहे.
मिरजेत तंतुवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. येथील सतारमेकर कुटुंबियांचा यामध्ये विशेष लौकिक आहे. या कुटुंबातील मजिद सतारमेकर जपानमधील कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.