जतमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील पदपथाचे काम रिपाइंने राेखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:34+5:302021-07-21T04:18:34+5:30
जत : जत शहरातील विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या पदपथाच्या पेव्हिंग ब्लॉकचे काम निकृष्ट झाल्याचा आराेप करीत ...
जत : जत शहरातील विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या पदपथाच्या पेव्हिंग ब्लॉकचे काम निकृष्ट झाल्याचा आराेप करीत रिपाइंने हे काम बंद पाडले. महामार्गाच्या कामाची गुणवत्ता त्रयस्थ संस्थेने तपासावी, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.
कांबळे म्हणाले, केंद्र सरकारने जत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय विजापूर-गुहागर या रस्त्याच्या कामास मंजुरी दिली होती; परंतु शहरातील महामार्गाच्या कामात मनमानी सुरू आहे. यात रुंदी कमी करणे, निकृष्ट काम, गुण नियंत्रणाचे काम व्यवस्थित पाहिले जात नाही. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टीने यापूर्वी आंदोलन केले आहे. रिपाइंने रस्त्यावर उतरत निकृष्ट पेव्हिंग ब्लॉकचे काम बंद पाडले.
आंदोलन सुरू असताना निकृष्ट कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी ब्लॉकच्या खाली मातीमिश्रित खडी पसरल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी कामे खचली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महामार्गाच्या कामावरील अधिकाऱ्यांना कामासाठी वापरत असलेल्या साहित्याची व दर्जाची माहिती व्यवस्थित देता आली नाही.
कांबळे म्हणाले, वेळोवेळी तक्रार देऊन देखील कामाच्या दर्जाबाबत कोणतीही सुधारणा केली नाही. संबंधित कंपनीने कामाचा दर्जा तपासणे गरजेचे आहे. संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला रस्ते प्राधिकरण पाठीशी घालत आहे. शहरात अनेक ठिकाणी अप्रोच रस्त्याची गरज असताना ते देखील रस्ते केलेले नाहीत. या कामामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रस्तावित आराखड्याप्रमाणे काम सुरू नाही. दर्जा न सुधारल्यास येत्या आठ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांबळे यांनी दिला.
200721\img-20210720-wa0038.jpg
राष्ट्रीय महामार्गावरील पादचारी पेव्हींग ब्लॉक बसविण्याचे काम रिपाईने बंद पाडले