जतमध्ये तिघा दरोडेखोरांना पकडले नागरिकांकडून बेदम चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 09:26 PM2018-06-16T21:26:20+5:302018-06-16T21:26:20+5:30
जत शहरातील निगडी कॉर्नर येथील साळे यांच्या होलसेल किराणा दुकानात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दरोड्याचा प्रयत्न झाला.
जत : जत शहरातील निगडी कॉर्नर येथील साळे यांच्या होलसेल किराणा दुकानात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दरोड्याचा प्रयत्न झाला. साळे यांच्या प्रसंगावधानामुळे दुकानावरील पत्रेउचकटून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहापैकी तीन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. नागरिकांनी बेदम चोप देऊन त्यांना पोलिसांच्या हवाली केले.
सिध्दार्थ दत्ता चव्हाण (वय २०), बाबू विष्णू काळे (२७, दोघेही रा. मधला पारधी तांडा, जत) व वसंत रतन पवार (वय २७, रा. पुणे) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कटर, टॉमी, मिरची पावडर आदी साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी प्रज्ज्वल श्रीमंत साळे यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
प्रज्ज्वल साळे यांचे निगडी कॉर्नर चौकात भाग्यश्री किराणा स्टोअर्स नावाने होलसेल व रिटेल दुकान आहे. यापूर्वीही त्यांच्या दुकानात चारवेळा व शेजारी असणाऱ्या धानेश्वरी किराणा स्टोअर्समध्ये दोनवेळा चोरी झाली आहे. याशिवाय या चौकातील लहान-मोठ्या दुकानांमध्येही तीन-चारवेळा चोरी झाली आहे. परंतु यासंदर्भात जत पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता. सतत होणाºया चोºयांमुळे साळे व परिसरातील इतर दुकानदार गेल्या काही दिवसांपासून आपापल्या दुकानातच मुक्कामास असतात. शनिवारी रात्री एकच्या दरम्यान सहा दरोडेखोर निगडी कॉर्नर परिसरात आले.
त्यापैकी तिघे साळे यांच्या दुकानावर चढून पत्रा उचकटत होते, तर तिघे टेहळणीसाठी समोर थांबले होते. पत्र्याचा आवाज ऐकून दुकानात झोपलेले साळे व कुटुंबीय जागे झाले. त्यांनी याची माहिती शेजाºयांना आणि पोलिसांना दूरध्वनीवरून दिली. काही क्षणातच गावातील बहुतांश नागरिकांना मोबाईलवरून गावात दरोडेखोर शिरल्याची माहिती मिळाली. नागरिक व पोलीस तात्काळ साळे यांच्या दुकानाकडे धावले. अचानक आलेला जमाव पाहून दरोडेखोर गडबडले. रस्त्यावर थांबलेले तिघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर दुकानावर चढलेले सिध्दार्थ चव्हाण, बाबू काळे व वसंत पवार यांना नागरिकांनी पकडले. बेदम मारहाण करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना अटक करून उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.कारवाईत पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार, सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस हवालदार विजय वीर, बजरंग थोरात, सचिन हाक्के, आप्पासाहेब हाक्के, राजू पवार यांनी भाग घेतला.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
जत पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. रात्री गस्त घालणाºया पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी धावले. त्यामुळे तीन दरोडेखोर सापडले. फरारी झालेल्या तिघांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून जत, उमदी व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोºया व घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती जतचे विभागीय पोलीस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे व पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांनी दिली.