जत तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी चार दिवसात

By admin | Published: March 7, 2016 11:57 PM2016-03-07T23:57:58+5:302016-03-08T00:49:10+5:30

विलासराव जगताप : शेगावमध्ये संयुक्त बैठक; शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेण्यासाठी पर्यायी कार्यालय सुरू करणार

In Jat taluka 'Mhaysal' water in four days | जत तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी चार दिवसात

जत तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी चार दिवसात

Next

जत/शेगाव : म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्यातून येत्या चार ते पाच दिवसांत जत तालुक्याच्या शिवारात पाणी येणार आहे. कुची (ता. कवठेमहांकाळ) ऐवजी जत येथेच शेतकऱ्यांकडून पैसे भरुन घेण्यासाठी पर्यायी कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेगाव येथे म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, म्हैसाळ योजनेचे पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत आ. जगताप बोलत होते. शेगाव येथे ‘म्हैसाळ’च्या पाण्यासंदर्भात लाभक्षेत्रातील शेगाव, वाळेखिंडी, कुंभारी, कोसारी, रेवनाळ, तिप्पेहळ्ळी, बनाळी, वायफळ, अंतराळ, काशिलिंगवाडी, बागलवाडी, कंठी, डोर्ली, बाज आदी वीस गावांतील शेतकरी उपस्थित होते. जि. प. सदस्य सुरेश मुटेकर, जि. प. सदस्य संजीवकुमार सावंत, लक्ष्मण बोराडे, तहसीलदार अभिजित पाटील, म्हैसाळ योजनेचे अधिकारी सचिन पवार उपस्थित होते.
यावेळी आ. जगताप यांनी १५ गावांतील लाभक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांच्या पाण्यासंदर्भात अडचणी जाणून घेतल्या. पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी लगेच मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ, सांगली कारखान्यांना ऊस घातला आहे, अशा शेतकऱ्यांनी थकबाकी ऊस बिलातून वळती केली असल्यास तशी कारखान्याकडून पोहोच घ्यावी. त्या शेतकऱ्यांनी सध्या थकबाकी भरण्याची आवश्यकता नाही. ‘म्हैसाळ’चे पाणी हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे नवीन बागायत क्षेत्र न वाढवता उपलब्ध बागा, पिके जगविणे महत्त्वाचे आहे, असेही आ. जगताप यांनी सांगितले.
यावेळी काही शेतकऱ्यांनी जतच्या राजारामबापू साखर कारखान्याच्या युनिट क्र. ४ ने म्हैसाळ योजनेची थकबाकी का भरली नाही?, असा सवाल करत हा कारखाना म्हैसाळ योजनेचे पाणी वापरतो, मग त्यांनीही बिलाच्या थकबाकीची रक्कम भरावी. बिल न भरल्यास तहसीलदारांनी उपसाबंदी आदेश लागू करावा, असे सांगितले. यावर म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी, जत साखर कारखान्याला पाणी पुरवठा करणारी योजना सांगली एमआयडीसीच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. त्यामुळे म्हैसाळ कार्यालयाकडून त्यांना पाणीपट्टी भरण्याविषयी पत्र देण्यात आले.
यावेळी १५ गावांतील शेतकऱ्यांनी वाढीव वीज बिल भरण्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी नारायण सावंत, सरपंच एन. डी. शिंदे, सतीश बुवा, गणेश साबळे, महादेव पाटील, राजू चौगुले, धनंजय नरके, डॉ. सुभाष खिलारे, सचिन बोराडे, उपेंद्र रानडे उपस्थित होते. (वार्ताहर)


शेतकऱ्यांनी थकबाकी भरून सहकार्य करावे
म्हैसाळ योजनेचे पाणी शेतीसाठी जे वापरतात, त्यांनी थकबाकी भरणे आवश्यक आहे. सध्या कवठेमहांकाळ, मिरज या भागातील शेतकऱ्यांनी व कारखान्यांनी थकबाकी भरल्याने त्यांचे पाणी सुरू आहे. मात्र जतमधील शेतकऱ्यांनी मागणी अर्ज व थकबाकी भरल्याशिवाय पाणी मिळणे अवघड होणार आहे. आम्हाला शासनाकडे पाण्यासाठी विचारणा करावयाची झाल्यास, तुमच्याकडून एकही पाणी मागणी अर्ज आला नाही व पैसे भरले नाहीत, असे उत्तर मिळते. त्यामध्ये प्रथम ‘म्हैसाळ’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज देऊन थकबाकी भरावी. त्यानंतर ५ ते ६ दिवसांत पाणी जत तालुक्यात दाखल होईल, असे प्रतिपादन आ. विलासराव जगताप यांनी शेगाव (ता. जत) येथे केले.


वीस गावांतील शेतकरी उपस्थित
कुंभारी, कोसारी, धावडवाडी, सिंगनहळ्ळी, शेगाव, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, रेवनाळ, डोर्ली, अंकले, बेळुंखी, वाळेखिंडी आदी वीस गावांतील लाभार्थी या बैठकीसाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त थकबाकी जमा करावी, असेही आवाहन आ. जगताप यांनी केले. तसेच थकबाकी जमा झाली नाही, तर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: In Jat taluka 'Mhaysal' water in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.