जत तालुक्यामध्ये तुरीची वाढ खुंटली : शेतकरी आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:19 PM2018-12-01T23:19:11+5:302018-12-01T23:22:12+5:30
परतीच्या पावसाने दिलेली दडी, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. शेंगा कमी लागल्या आहेत. शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत.
गजानन पाटील ।
संख : परतीच्या पावसाने दिलेली दडी, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. शेंगा कमी लागल्या आहेत. शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादन कमी होणार आहे. उत्पादनात ८० टक्क्याने घट होणार आहे.
तालुक्यातील उटगी येथील शेतकऱ्यांना दोन एकरात ३० किलो तुरीचे उत्पादन मिळाले. ज्या प्रमाणात खर्च केला, त्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्याने निराश होऊन शेतकºयाने आत्महत्या केली. त्यामुळे तुरीच्या उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यात कडधान्य म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, कमी पावसावर, कमी भांडवलात व माळरानावर तूर पीक येत असल्याने शेतकºयांचा हे पीक घेण्याकडे गेल्या पाच वर्षापासून कल वाढला आहे. तूर, तीळ, करडई, भुईमूग, सोयाबीन, मटकी ही गळीत व कडधान्य पिके घेतात. यंदा पाऊस पडेल, या आशेवर ५ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्यात आली आहे. पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. पावसाअभावी प्रतिकूल हवामानामुळे फूलगळही झाली आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात ८० टक्के घट होणार आहे.
तालुक्यातील पहिल्या पावसावर शेतकºयांनी तुरीची पेरणी केली होती. हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल असे सांगितले होते. पण पाऊस कमी झाल्याने अपेक्षित वाढ झाली नाही.
सरकार सवलत का देत नाही?
तुरीची आधारभूत किंमत क्विंटलला ५४५० रुपये आहे. कर्नाटक सरकार शेतकºयांना क्विंटलला ५०० रुपये अनुदान देते, तर राज्य शासन तुरीला का अनुदान देत नाही. कर्नाटकात ५९५० रुपये क्विंटल दराने सरकार तूर खरेदी करते. गावातील सेवा सोसायटीला खरेदी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर मग आमचे शासन शेतकºयांना सवलत का देत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तूर उत्पादक शेतकºयाची आत्महत्या
तालुक्यात प्रथमच उटगी येथील लायाप्पा रायगोंडा इंचूरया शेतकºयाने तुरीचे उत्पादन कमी आल्याने आत्महत्या केली आहे. त्यांना दोन एकरातून २५ ते ३० किलो उत्पादन मिळाले.
एकरी खर्चावर दृष्टिक्षेप...
मशागत : २१०० रुपये, पेरणी : ५०० रुपये
बियाणे : ५०० रुपये, दोन वेळा कोळपणी : १००० रुपये
चार फवारण्या : १६०० रुपये, काढणी : २००० रुपये
तूर पेरणी क्षेत्र...
गेल्यावर्षी झालेली पेरणी : ७ हजार १०० हेक्टर
यावर्षी झालेली पेरणी : ५ हजार ३२ हेक्टर
तीन एकर तूर पेरणी केली आहे. पाऊस नसल्याने अपेक्षित उत्पन्न नाही. सध्या तूर वाळू लागली आहे. काहीच उत्पादन मिळणार नसल्याने घातलेला खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. तुरीच्या उत्पादनातही घट येणार असल्यामुळे शेतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. शासनाने मदत करावी.
- प्रशांत जामगोंड, तूर उत्पादक