जत तालुक्याला अच्छे दिन येणार का?
By admin | Published: November 3, 2014 10:34 PM2014-11-03T22:34:51+5:302014-11-03T23:27:02+5:30
मूलभूत प्रश्न सुटण्याची गरज : तालुका विभाजनाकडेही गांभीर्याने लक्ष हवे
भागवत काटकर - जत -केंद्रात व राज्यात भाजपचे शासन, तर जत तालुक्यातही आमदार विलासराव जगताप यांच्या रूपाने भाजपची सत्ता आली आहे. तालुक्यातील रस्ते, ६७ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश, तालुका विभाजन आदी कामे प्रलंबित राहिली आहेत. आता भाजपचे विलासराव जगताप यांना संधी मिळाल्याने, जत तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना पहिल्यांदाच जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला. मोदी लाटेच्या गणिताने संजयकाका खासदार झाले. त्यांच्या विजयानंतर जगताप यांनी तालुक्यात गावोगावी आभार दौरे करून पुन्हा नेटवर्क उभे केले. पाटील यांच्याकडून लोकांच्याही तालुक्याच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्याचा फायदा या निवडणुकीत जगताप यांना झाला. आता दुष्काळी जत तालुक्यातील जनतेच्या असंख्य अपेक्षा विद्यमान आमदार जगताप यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेतील वंचित ६७ गावांचा समावेश, तालुक्यातील ७0 टक्के रस्त्यांची दुरुस्ती, संख पोलीस ठाणे मंजुरी आदी कामांचा समावेश आहे.
जत पूर्व भागातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना भरघोस मताधिक्य दिले. या पूर्व भागातील लोकांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत, एक तालुका विभाजन व दुसरी म्हैसाळ योजनेत समावेश. वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जनतेला पाण्याच्या टँकरपासून मुक्ती हवी आहे. या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यास ऊस तोडीसाठी जाणाऱ्या सुमारे २५ ते ३५ हजार मजुरांचे स्थलांतर थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जत तालुक्याचे क्षेत्रफळ अधिक आहे. १२३ गावांच्या या तालुक्याचे विभाजन करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. शासकीय कामासाठी या भागातील लोकांना ५0 ते ६0 कि.मी. अंतरावर जतला यावे लागते. जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी, रेशन कार्डधारकांची विविध कामे या व इतर कामासाठी जत येथील तहसील कार्यालयाकडे यावे लागते.
ही कामे एका दिवसात कधीच होत नाहीत. यासाठी वेळ, पैसा विनाकारण खर्च करण्याची वेळ जनतेवर येते. यासाठी तालुका विभाजन होणे ही एक प्रमुख मागणी आहे. शिवाय संख येथे पोलीस ठाण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
केंद्रात, राज्यात एकाच विचाराचे शासन आहे. नूतन आमदार विलासराव जगताप हे अभ्यासू व संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्त्व आहे. तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून, तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रस्ते दुरुस्तीची गरज
जत तालुक्यात ६0 ते ७0 टक्के रस्ते कच्चे आहेत. खराब रस्त्यामुळे लोकांचा वेळ व वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. जत शहरातील रस्त्यासाठी निधी मिळण्याची मागणी होत आहे.
महसूल विभागाचा कारभार तर अत्यंत कमी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. १0 ते १२ गावांसाठी एक तलाठी अशी अवस्था आहे.