जत तालुक्यास कर्नाटकातून पाणी मिळणार

By admin | Published: April 11, 2017 12:25 AM2017-04-11T00:25:15+5:302017-04-11T00:25:15+5:30

विलासराव जगताप : गुड्डापुरात पाणी टंचाई आढावा बैठक; ‘म्हैसाळ’ला निधी कमी पडू देणार नाही

Jat taluka will get water from Karnataka | जत तालुक्यास कर्नाटकातून पाणी मिळणार

जत तालुक्यास कर्नाटकातून पाणी मिळणार

Next



जत : जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना कर्नाटकातून पाणी देण्यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात बोलणी झाली आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासन कर्नाटक शासनाला चार टीएमसी पाणी सोडणार आहे. त्याच्या मोबदल्यात जत तालुक्याला कर्नाटकातून पाणी मिळणार असल्याची माहिती आ. विलासराव जगताप यांनी दिली. गुड्डापूर (ता. जत) येथे आयोजित केलेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या अपूर्ण कामासंदर्भात येत्या चार-पाच दिवसात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. बिळूर व देवनाळ कालव्यासाठी निधी आला आहे. आता निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले की, तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना आता कालव्यातून येणारे पाणी मिळणार आहे. पूर्व भागात पाणी येण्यास आणखी कालावधी लागणार आहे. जत तालुका विस्ताराने मोठा आहे. तालुका विभाजनास आणखी वेळ लागणार आहे. तोपर्यंत पूर्व भागासाठी एक स्वतंत्र तहसीलदार दिला जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सध्या तालुक्यात बंद आहेत. परंतु परवानगी घेऊन यापुढे काम सुरू करता येणार आहे. यापूर्वी झालेल्या कामाचे बिल निघणार आहे. तालुक्यातील २३ पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण आहेत. त्यापैकी काही ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध आहे; परंतु काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. यासंदर्भात एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
तालुक्यात भयानक चारा व पाणी टंचाई जाणवत आहे. प्रतिटँकर तीन ते पाच हजार रुपये खर्च करुन टँकरद्वारे पाणी आणून फळबागांना दिले जात आहे. शासन कर्जमाफी करत नाही, त्यामुळे टँकरसाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी पं. स. माजी सदस्य बिळ्यानी बिराजदार यांनी केली.
टंचाई आढावा बैठकीस गैरहजर असणारे ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करावा, याशिवाय गैरहजर सरपंच, उपसरपंच यांना उपस्थित राहण्याची सूचना करावी, असा आदेशही जगताप यांनी दिला. सुरुवातीस गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वीज वितरण, टँकर, पाणीपुरवठा आदी विषयांवर चर्चा झाली. प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार अभिजित पाटील, पंचायत समिती सभापती मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, जि. प. सदस्य सरदार पाटील, एम. टी. मठपती, सी. आर. गोब्बी, मनोज जगताप, लक्ष्मी माळी, विष्णू चव्हाण, श्रीदेवी जावीर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Jat taluka will get water from Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.