‘जत’मध्ये टँकरलाही पाणी मिळेना

By admin | Published: March 14, 2016 10:27 PM2016-03-14T22:27:08+5:302016-03-14T22:27:08+5:30

पाणीसाठे संपुष्टात : प्रशासकीय यंत्रणा विवंचनेत; ७३ टँकरद्वारे पाणी पुरवठा

In 'Jat', the tanker also got water | ‘जत’मध्ये टँकरलाही पाणी मिळेना

‘जत’मध्ये टँकरलाही पाणी मिळेना

Next

जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील गावांची संख्या ११६ आहे. त्यापैकी ५६ गावे आणि त्याखालील ४९४ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ३८ हजार ३२४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९९० नागरिकांना माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा होत आहे.
मार्च महिन्यात दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. पाण्याचे टॅँकर व चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. सध्या ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअस इतके तापमान आहे. तुरळक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणीसाठे व पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पाणीसाठे संपुष्टात आल्यानंतर टॅँकर भरण्यासाठी पाणी कोठून आणायचे, या विवंचनेत प्रशासकीय यंत्रणा आहे. मार्च महिन्यात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. यानंतर एप्रिल व मे महिन्यात काय परिस्थिती निर्माण होणार?, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) साठवण तलावातून उमराणी, अमृतवाडी, बिळूर, बसर्गी, खोजानवाडी, व्हसपेठ (राजोबाचीवाडी), उंटवाडी, अचकनहळ्ळी या आठ गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बिरनाळ तलावात म्हैसाळ कालव्यातून आलेला पाणीसाठा आहे. या तलावातील पाणीसाठा समाधानकारक असला तरी येथून तालुक्याच्या पूर्व भागात साठ-सत्तर किलोमीटर लांब अंतरावर टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होणारे नाही. त्यामुळे तालुका प्रशासन पर्यायी उपाययोजना शोधत आहे.
तालुक्यात ७४ टॅँकरसाठी प्रशासनाने १८०.७५ खेपा पाणी मंजूर केले असले, तरी प्रत्यक्षात १६७ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे. १३.७५ खेपाचे पाणी नागरिकांना मिळत नाही. प्रशासनाच्यावतीने माणसी वीस लिटर पाणी फक्त पिण्यासाठी मंजूर असले, तरी नादुरुस्त टॅँकर, वीज दाबनियमन, खराब रस्ते, पाणी उद्भव ठिकाण आदी कारणांमुळे सोळा किंवा सतरा लिटर पाणी मिळत आहे. उर्वरित पाणी मिळविण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
प्रशासनाने जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था अद्याप केलेली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तरी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सुशिला व्हनमोरे यांनी केली आहे.
वायफळ (ता. जत) गावासाठी शासनाने २००८-२००९ या आर्थिक वर्षात भारत निर्माण योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. या कामासाठी ४६ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. ठेकेदाराने ४६ पैकी २५ लाख रुपये घेतले आहेत. त्यातून पाणीपुरवठा विहीर व पाईपलाईनचे काम केले आहे. पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण आहे. पाईपलाईनचे काम निकृष्ट झाले आहे. पाणी पुरवठा विहिरीत पाणी आहे. परंतु निकृष्ट काम व पाण्याची टाकी नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.


दीड लाख
नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत
५६ गावे आणि त्याखालील ४९४ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ३८ हजार ३२४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९९० नागरिकांना माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा होत आहे.


चालूचे १४ कोटी शिल्लक : नवीन १६ कोटीच
म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून बिरनाळ तलावात पाणी सोडून तालुक्याच्या पूर्व भागासाठी नियोजित नगाराटेक (जत) ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेला प्राधान्यक्रम देऊन निधी मंजूर केल्यास शासनाचा प्रत्येकवर्षी पाणी टंचाईवर होणारा खर्च वाचणार नाही. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया जत येथील अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रभाकर जाधव यांनी दिली.

Web Title: In 'Jat', the tanker also got water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.