जतमध्ये शिंदीच्या वनात घटगजानन पाटील ।
By admin | Published: May 17, 2017 11:23 PM2017-05-17T23:23:08+5:302017-05-17T23:23:08+5:30
जतमध्ये शिंदीच्या वनात घटगजानन पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी पातळी कमी झाल्यामुळे जत पूर्व भागात पडिक व नापीक जमीन वाढली आहे. परिणामी ओढ्याकाठी, शेतीच्या बांधावर, कमी पावसाच्या भागात आढळणारी शिंदीची झाडे कमी झाली आहेत. बोर नदी, ओढ्याकाठी असलेली शिंदीची वने दुर्मिळ होऊ लागली आहेत. त्यामुळे नैसर्गिक शिंदी उत्पादनात मोठी घट झाली आहे.
दुष्काळी भागातील शिंदीच्या झाडांना मे महिन्यात फळे येतात. बोर नदीकाठी, ओढ्याकाठी, बांधावर या झाडांचे प्रमाण अधिक आहे. शिंदीच्या फळांना बजूर (शिंदोळ्या) म्हणतात. या झाडापासून नीरा हे सकस पेय मिळते. शिंदीच्या पानापासून चटया, केरसुणी बनवितात.
पूर्व भागातील मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, रावळगुंडवाडी, कागनरी, जालिहाळ बुद्रुक, तिकोंडी, करजगी, बोर्गी या गावांमध्ये बोर नदीकाठी, ओढ्याकाठी, शेतीच्या बांधावर या झाडांची संख्या अधिक आहे. ही गावे शिंदीसाठी प्रसिध्द आहेत. शिंदी बनविण्याचा व्यवसाय कर्नाटक व आंध्र प्रदेशमधून आलेले येळगार लोक करतात. पावसाचे प्रमाण गेल्या १० वर्षांपासून कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे. सध्या ही पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत गेली आहे. परिणामी ही झाडे वाळू लागली आहेत.
शासनाने शिंदीचा समावेश फळझाडांमध्ये केला आहे. या झाडांची वाढ जलद होते. कमी खर्चात लागवड करता येते. पडिक व नापीक जमिनीच्या ठिकाणी लागवड केल्यास उत्पादन व रोजगार मिळू शकतो. जत पश्चिम भागात ‘म्हैसाळ’चे पाणी आले आहे. ओढ्याकाठी झाडांची लागवड, संवर्धन करणे शक्य आहे. पूर्व भागात वन विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
नीरा : आयुर्वेदिक पेय
शिंदीची रोपे काळजीपूर्वक वाढविली की पाच ते सहा वर्षांत झाड तयार होते. शिंदीपासून मिळणारे नीरा हे अत्यंत सकस, आयुर्वेदिक पेय आहे. शरीरातील उष्णता, दाहकता, आम्लपित, मधुमेह यावर हे रामबाण औषध आहे. एक झाड वर्षाला २६० ते ३२० लिटर द्रवरूप नीरा देते.
पाणी पातळीसाठी मदत
ओढ्याकाठी, बांधावर झाडे असल्याने मुळांद्वारे माती मोठ्या प्रमाणात धरली जाते. पाणी पातळी टिकविण्यासाठी ही झाडे मदत करतात.