जतला वाळू, मुरूम तस्करी रोखली
By admin | Published: January 4, 2015 11:45 PM2015-01-04T23:45:03+5:302015-01-05T00:36:24+5:30
सव्वा लाखाचा दंड : जेसीबी, डंपरसह ११ वाहने जप्त, कारवाईने खळबळ
जत : तालुक्यातील संख, भिवर्गी, देवनाळ, कुंभारी, पांढरेवाडी येथून विनापरवाना वाळू आणि मुरुम वाहतूक करणारे नऊ ट्रॅक्टर, एक डंपर व एक जेसीबी अशी दहा वाहने जप्त करून वाहनमालकांकडून १ लाख ३२ हजार रुपये इतकी दंड आकारणी करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. जत विभाग प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार डी. एम. कांबळे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यामुळे येथील वाळू तस्करांत खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संख, पांढरेवाडी, जालिहाळ येथील ओढा पात्रातून शनिवारी रात्री एकाचवेळी सहा ट्रॅक्टर विनापरवाना वाळू उपसा करत होते. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी एकाचवेळी येथे छापा टाकला असता, वाळू भरणारे मजूर आणि ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर ओढा पात्रातच सोडून पळून गेले. ही वाळू ट्रॅक्टरसह जप्त करून संख औटपोस्ट येथे लावण्यात आले आहेत.
भिवर्गी येथील बोर नदी पात्रातून डंपर क्रमांक (के. एच. २८, बी १७८९) मध्ये विनापरवाना वाळू भरली जात असताना तो जप्त करुन उमदी पोलीस स्टेशनला लावण्यात आला आहे. देवनाळ (ता. जत) ओढा पात्रातून विक्रम बापूसाहेब पाटील (रा. पाच्छापूर, ता. जत) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर विनापरवाना वाळू उपसा करत असताना तो जप्त करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जत पोलिसांनी देण्यात आले. कुंभारी (ता. जत) येथून जेसीबीने मुरुम खोदून तो दोन ट्रॅक्टरमध्ये भरला जात असताना वरील तीन वाहने जप्त करुन जत तहसील कार्यालयात आणण्यात आली. एका वाहनासाठी बारा हजार रुपये याप्रमाणे दंड आकारणी करुन वरील नऊ वाहन मालकांना १ लाख ३२ हजार रुपये इतका दंड भरण्यासंदर्भात तहसीलदार जत यांनी नोटीस पाठविली आहे.
मंडल अधिकारी हसन निडोणी, ताजुद्दीन मुल्ला, गुरबसू शेट्यापगोळ, हाजी जातगार, अरुण कणसे, अरुण साळुंखे व बी. एम. सवदे यांनी या कारवाईत भाग घेतला. (वार्ताहर)
दंडात्मक कारवाई
भिवर्गी येथील बोर नदी पात्रातून विनापरवाना वाळू भरली जात होती, तर देवनाळ येथे ओढा पात्रातून विनापरवाना वाळू उपसा सुरू होता. तसेच कुंभारी (ता. जत) येथे जेसीबीने मुरुम खोदून तो दोन ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. वरील तीनही ठिकाणी मिळून आलेली ११ वाहने जप्त करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली.