जतचे आगार व्यवस्थापक होनराव निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:18+5:302021-01-02T04:23:18+5:30
जत : स्लीपरकोच एसटी बसची प्रवासी तिकीट आकारणी साध्या दराने करून महामंडळाचे ५१ हजारांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून जत येथील ...
जत : स्लीपरकोच एसटी बसची प्रवासी तिकीट आकारणी साध्या दराने करून महामंडळाचे ५१ हजारांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून जत येथील एसटीचे आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
विरेंद्र होनराव हे जत येथे आगार व्यवस्थापक आहेत. जत येथून मुंबईला स्लीपरकोच बस सुरू आहे. होनराव यांनी मुंबई ते जत परत आल्यानंतर ही बस जत ते विजापूर, जत ते तुळजापूरदरम्यान प्रवासी वाहतुकीसाठी दिली. मात्र साध्या दराने तिकिटे देऊन एसटी महामंडळाचे ५१ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. नुकसानीचा ठपका ठेवून त्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले.
स्लीपरकोच एसटी बस जत ते मुंबईदरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी महामंडळाने दिली असताना, तिचा वापर त्यांनी इतर ठिकाणी केला होता. यासंदर्भात कर्मचारी संघटना व काही प्रवासी नागरिकांनी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून विरेंद्र होनराव यांची चौकशी केल्यानंतर ते दोषी आढळून आले होते. या घटनेमुळे जत आगारात खळबळ माजली आहे.