जतच्या ‘मनरेगा’ घोटाळ्याची व्याप्ती मोठी
By admin | Published: February 10, 2017 12:02 AM2017-02-10T00:02:52+5:302017-02-10T00:02:52+5:30
एस. चोक्कलिंंगम् : प्राथमिक अहवाल मिळाला; जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश
सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मधील निधीतील जत तालुक्यातील कामांमध्ये गैरकारभार झाल्याचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे अधिकाऱ्यांना याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी विभागीय आयुक्त सांगलीत आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सहाय्यक आयुक्त रश्मी खांडेकर, सहाय्यक आयुक्त सोनाली घुले, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, उपायुक्त संभाजी लांगोरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी, किरण जाधव, रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पुढे म्हणाले की, जत तालुक्यातील मनरेगा योजनेतील निधी हा लाभार्थींच्या खात्यावरच जाणे अपेक्षित आहे. अन्य व्यक्तींच्या खात्यावर निधी वर्ग होणे ही गंभीर बाब आहे. बोगस कामेही प्राथमिक चौकशीत दिसत आहेत. या घोटाळ्यामध्ये जे दोषी असतील, त्यांना सोडणार नाही. प्रत्येकावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. या गैरकारभाराची व्याप्ती लक्षात घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांना मनरेगातील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अहवालानंतरच गैरव्यवहारामध्ये कुणाचा आणि किती सहभाग आहे, हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)