इस्लामपुरात जयंत पाटील-आनंदराव पवार यांची भेट चर्चेत, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:12 PM2022-05-06T17:12:56+5:302022-05-06T17:13:35+5:30
जयंत पाटील यांनी शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. आगामी निवडणुकीतही धनुष्यबाणाची ताकद दाखवू.
इस्लामपूर : येथील आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येण्याबाबत साशंकता आहे. मात्र शहरात रमजान ईदनिमित्त जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार एकत्रित आले. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे निश्चित आहे, तर विरोधी विकास आघाडीतील शिवसेनेची भूमिका आजही धनुष्यबाणावर लढण्याची आहे. राज्यातील सत्तेत एकत्र असले तरी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय अद्याप जिल्हाप्रमुख पवार यांनी घेतलेला नाही. शिवजयंतीनिमित्त यल्लम्मा चौकात भाजपचे नेते, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आनंदराव पवार एकत्र आले. त्यामुळे सद्यस्थितीत पवार विकास आघाडीसोबत असल्याचे दिसत आहे.
ही परिस्थिती असतानाच रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी स्वागत कक्ष उभे केले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने वेगवेगळ्या व्यासपीठावरून शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पवार यांच्याशी जवळीक साधली. जिल्हा बँकेचे संचालक चिमण डांगे यावेळी उपस्थित होते. या तिघांच्या भेटीमुळे शहरात चर्चा सुरू झाली. आनंदराव पवार आज राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार नसले तरी जयंत पाटील मात्र आगामी काळात शिवसेनेचा ‘कार्यक्रम’ करतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दोघे बसून आघाडीचा प्रश्न मिटवू
ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच नेत्यांनी स्वागत कक्ष उभे केले. तेथे जयंत पाटील व आनंदराव पवार यांची भेट झाली. या भेटीमध्ये पाटील यांनी, ‘वरून दबाव येण्यापेक्षा आपण दोघे बसून इस्लामपुरातील आघाडीचा प्रश्न मिटवू’, असा सबुरीचा सल्ला देत शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्याकडे बघत, ‘बैठकीला बसा’, असा सल्ला दिल्याचे समजते.
जयंत पाटील यांनी शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. मागीलवेळी पालिकेत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी ‘एन्ट्री’ केली. सध्या आम्ही विकास आघाडीत आहोत. आगामी निवडणुकीतही धनुष्यबाणाची ताकद दाखवू. - आनंदराव पवार, जिल्हा प्रमुख, शिवसेना.