आता हे सरकार जनतेला चंद्र-तारे सुद्धा देतो म्हणेल, महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:19 PM2024-07-20T15:19:10+5:302024-07-20T15:19:34+5:30

इस्लामपूर : राज्यातील जनतेची सरकार बदलण्याची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणावर घोषणा करीत आहे. येत्या तीन महिन्यात ...

Jayant Patil comments on the announcements of Mahayuti | आता हे सरकार जनतेला चंद्र-तारे सुद्धा देतो म्हणेल, महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला

आता हे सरकार जनतेला चंद्र-तारे सुद्धा देतो म्हणेल, महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला

इस्लामपूर : राज्यातील जनतेची सरकार बदलण्याची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणावर घोषणा करीत आहे. येत्या तीन महिन्यात ते चंद्र-तारेही देऊ म्हणतील, असा उपरोधात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मारला.

इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या वाळवा तालुका असंघटित बांधकाम कामगार संघटनेने तालुक्यासह इस्लामपूर व आष्टा शहरातील २ हजार कष्टकरी कुटुंबांना भांडी संच वाटप करण्यात आले. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, सरपंच संजय पाटील, भगवान पाटील, सभापती संदीप पाटील, संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण, शहराध्यक्ष निवास जाधव, आष्टा शहराध्यक्ष प्रकाश पवार, निवास गायकवाड उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने प्रतीक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना, आपण असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केले. कष्ट करणाऱ्या कुटुंबांना विविध लाभ देताना ऐन संकटात मदतीचा हात देता यावा, हा हेतू होता. सध्या हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असून बांधकाम आणि इतर क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कुटुंबांना स्थिरता व सुरक्षितता देण्याचे काम करीत आहे. हे पाहून समाधान वाटते. भविष्यात जे सहकार्य लागेल, ते देत राहू.

सुभाषराव सूर्यवंशी म्हणाले, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटीत कष्टकरी भावा-बहिणींना संघटित करून त्यांना शासनाचे विविध लाभ मिळवून देत आहे. राज्यात प्रथम आम्ही मुलीच्या लग्नास ५१ हजार मंजूर करून घेतले. यावेळी शहाजी पाटील, संजय पाटील, पुष्पलता खरात, सागर चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनीता सौंदडे यांनी आरोग्यविषयक माहिती दिली.

यावेळी बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, खंडेराव जाधव, पुष्पलता खरात, माजी नगरसेवक रणजित मंत्री, कृष्णेचे संचालक संजय पाटील, दिग्विजय पाटील, अरुण कांबळे, शैलेश पाटील, हणमंत माळी, राजकुमार कांबळे, शंकरराव चव्हाण, अनिल पावणे, विलास भिंगार्डे, आयुब हवलदार, गुरुराज माने उपस्थित होते. संपर्क प्रमुख अविनाश गायकवाड यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष विक्रम धुमाळ यांनी आभार मानले.

Web Title: Jayant Patil comments on the announcements of Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.