जयंत पाटलांना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर, इस्लामपुरात दलबदलू नेत्यांनाच भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 01:23 PM2022-11-04T13:23:48+5:302022-11-04T13:24:34+5:30
अलीकडील काळात पै-पाहुण्यांचे राजकारण फोफावले
अशोक पाटील
इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना पाठबळ देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, अशा ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पाटील यांना विसर पडत चालला आहे. राजकारणातील बदलत्या समीकरणांतून दलबदलू कार्यकर्त्यांचा भाव वधारत चालला आहे, अशी खंत राष्ट्रवादीतील जुने कार्यकर्ते, माजी नगरसेवक शंकरराव पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
राजारामबापू यांच्या निधनानंतर विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ आणि बापूंनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था पोरक्या झाल्या. बहुतांशी कार्यकर्त्यांतून बापूंचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुत्र जयंत पाटील यांचे नाव पुढे आले. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. परंतु उरुण परिसरातील बहुतांशी बापूप्रेमी कार्यकर्त्यांनी जयंतरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी मी एक कार्यकर्ता होतो. परंतु जयंतरावांचा वाढता राजकीय आलेख पाहून इतर पक्षातील कार्यकर्त्यांची घुसखोरी झाली, याची खंत शंकरराव पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील म्हणाले, राजारामबापू पाटील यांनी राज्याच्या सत्तेत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला. परंतु अलीकडील काळात आपला कोण, परका कोण, याचे आत्मपरीक्षणच केले जात नाही. ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे कार्यकर्त्यांचा ओघ, असे नवीन सूत्र राजकारणात आले आहे. त्यातच अलीकडील काळात पै-पाहुण्यांचे राजकारण फोफावले आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्ते जयंतरावांपासून दूर गेल्याचे दिसत असल्याचाही दावा काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यापैकी मी एक असून, आता राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आजही जयंतरावांशी एकनिष्ठ आहे.
भाडेकरू कार्यकर्त्यांची जमावाजमव
इस्लामपूर मतदारसंघातील राजारामबापू उद्योग समूहात सामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मुलांना न्याय दिला गेला नाही. नोकरीची गरज नसतानाही पदाधिकाऱ्यांनी आपल्याच घरातील नव्या पिढीला नोकऱ्या दिल्या गेल्याने नेत्यांना आता भाडेकरू कार्यकर्त्यांची जमावाजमव करावी लागत आहे, असे शंकरराव पाटील म्हणाले