इस्लामपूर बाजार समितीसाठी जयंतरावांचे विरोधक एकवटले, काँग्रेसची भूमिका अस्पष्टच 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 05:17 PM2023-04-21T17:17:05+5:302023-04-21T17:17:29+5:30

अर्ज मागे घेण्याच्या आधीच्या रात्री सांगली आणि इस्लामपूर बाजार समितीच्या उमेदवारीचा तिढा सोडवून जयंत पाटील मुंबईला रवाना झाले.

Jayant Patil opponents unite for Islampur Bazar Committee, Congress role unclear | इस्लामपूर बाजार समितीसाठी जयंतरावांचे विरोधक एकवटले, काँग्रेसची भूमिका अस्पष्टच 

इस्लामपूर बाजार समितीसाठी जयंतरावांचे विरोधक एकवटले, काँग्रेसची भूमिका अस्पष्टच 

googlenewsNext

इस्लामपूर : अखेर इस्लामपूर बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. राष्ट्रवादी विरोधात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांनी शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून थेट जयंत पाटील यांनाच आव्हान दिले आहे. परंतु, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.

अर्ज मागे घेण्याच्या आधीच्या रात्री सांगली आणि इस्लामपूर बाजार समितीच्या उमेदवारीचा तिढा सोडवून जयंत पाटील मुंबईला रवाना झाले. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीसाठी एकतर्फी असलेल्या निवडणुकीचा फंडा विरोधकांनी एकत्रित येऊन मोडीत काढला आहे. राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी होती. यातून तरुण आणि स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसरीकडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महाडिक गट, माजी नगरसेवक वैभव पवार यांच्या माध्यमातून काँग्रेससह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांना एकत्रित करून शेतकरी परिवर्तन पॅनलच्या रूपात राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे.

काँग्रेसची भूमिका अस्पष्टच 

परिवर्तन पॅनलबद्दल भाजपचे विक्रम पाटील यांनी राष्ट्रवादी विरोधाील पारंपरिक विरोधकांचा प्रचार करू, अशी प्रतिक्रिया दिली. या पॅनलमध्ये माजी नगरसेवक वैभव पवार आणि विजय पवार काँग्रेसच्या माध्यमातून सहभागी झाले असले तरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी अद्यापही भूमिका स्पष्ट केली नाही.

राहूल महाडीक, सम्राट महाडीक, वैभव पवार आणि आनंदराव पवार या प्रमुखांना एकत्रित करून शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून इस्लामपूर बाजार समितीची निवडणूक लढवत आहोत. -निशिकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप.


बाजार समितीत काँग्रेसला कोणीच जमेत धरले नाही. राष्ट्रवादी किंवा विरोधी गटातून विचारले गेले नाही. काँग्रेसच्यावतीने एकही उमेदवार रिंगणात नाही. आमची भूमिका वेळीच स्पष्ट करू. -जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष, काँग्रेस.

Web Title: Jayant Patil opponents unite for Islampur Bazar Committee, Congress role unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.