जयंत पाटील यांनी पातळी सांभाळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:49 AM2021-02-18T04:49:58+5:302021-02-18T04:49:58+5:30
सांगली : राजकीय टीका एका विशिष्ट पातळीवर झाली पाहिजे. मात्र मुद्दे नसले की, कुठल्याही थराला जाऊन टीका केली जाते. ...
सांगली : राजकीय टीका एका विशिष्ट पातळीवर झाली पाहिजे. मात्र मुद्दे नसले की, कुठल्याही थराला जाऊन टीका केली जाते. प्रदेशाध्यक्षपदाला हे शोभणारे नाही. त्यामुळे त्यांनी आपली पातळी सांभाळावी, असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले.
तावडे हे बुधवारी सांगलीत आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. महिलेच्या मतदारसंघातून निवडणूक लढविणे हा कसला पुरुषार्थ, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यावर तावडे म्हणाले की, राजकारणात टीकाटिप्पणी होत असते; पण प्रदेशाध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीने खालच्या पातळीवर जावून टीका करणे शोभणारे नाही. जयंत पाटील यांनी आपली पातळी सांभाळली पाहिजे.
मंत्र्यांवर होणार्या आरोपांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील होऊन निर्णय घेतले पाहिजे, अन्यथा पुढील पिढीवर विपरित परिणाम होतील. समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. शिवजयंती म्हणजे सामान्य माणसाचा भावनिक संबंध असणारा उत्सव आहे. कोरोनाबाबत सरकारला खबरदारी घ्यावी लागते, हे खरं आहे. मात्र आता सगळे चालू झाले आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना शिवजयंती मंडळे जर योग्य खबरदारी घेणार असतील, तर शासनाने परवानगी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.