Jayant Patil: जयंत पाटलांचे इस्लामपुरात टार्गेट फक्त शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:51 PM2022-04-18T17:51:56+5:302022-04-18T17:52:26+5:30
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, या विभागाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने एकत्रितपणे सत्तेत आहेत. परंतु इस्लामपूर शहरात मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार राष्ट्रवादीविरोधी विकास आघाडीमध्ये आहेत.
अशोक पाटील
इस्लामपूर : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, या विभागाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने एकत्रितपणे सत्तेत आहेत. परंतु इस्लामपूर शहरात मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार राष्ट्रवादीविरोधी विकास आघाडीमध्ये आहेत. येणाऱ्या पालिका निवडणुकीअगोदर जयंत पाटील यांचे टार्गेट शिवसेना राहणार आहे.
गत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधी असलेले सर्व पक्ष विकास आघाडीच्या झेंड्याखाली आले होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार विकास आघाडीत सामील झाले. त्यांनी धनुष्यबाणावर निवडणूक लढविली. प्रथमच पालिकेच्या सभागृहात शिवसेनेचे ५ नगरसेवक निवडून गेले. विकास आघाडीतील नंबर १ चा पक्ष म्हणून त्यांची गणती झाली. याच ताकदीवर इस्लामपूर शहरात शिवसेना वाढली. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघडी सत्तेत आली. परंतु इस्लामपुरात मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेची दखलही घेतली नाही.
वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीविरोधी भाजप पक्षाची ताकद आहे. कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या भरघोस यशाचा विचार करता, स्थानिक स्वराज्यसह इस्लामपूर, आष्टा पालिकेच्या निवडणुकीत ‘कोल्हापूर पॅटर्न’ राबविण्याची शक्यता आहे. त्यामुळेच इस्लामपुरात शिवसेनेला जयंत पाटील टार्गेट करतील, असे संकेत आहेत. तरीही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीविरोधातला आपला ठेका कायम ठेवला आहे.
पालकमंत्री पदाचा गैरवापर करून जयंत पाटील यांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यापर्यंत अन्याय केला. साखराळेला हद्दीतील मुख्य रस्ता शिवसेनेच्या फंडातून मंजूर केला होता. त्यांनी तो हाणून पाडला. शिवसैनिकांवर मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल करायला लावले, हे आम्ही कधीच विसरणार नाही. इस्लामपूरच्या विकासासाठी आणलेल्या ११ कोटी रुपयांच्या फंडाला त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली. शिवसेनेने शहरासाठी २१ कोटी रुपये फंड आणला. त्यामुळेच आगामी काळात आम्ही त्यांच्याबरोबर जाणार कसे? - आनंदराव पवार, जिल्हा प्रमुख, शिवसेना