जयंत पाटील, वैभव शिंदे येणार एकाच व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 05:14 PM2020-02-03T17:14:11+5:302020-02-03T17:14:50+5:30
आष्टा तालुका होण्यासाठी हे पहिले पाऊल पडले. वैभव शिंदे यांना भाजप शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक पद दिले. अशा परिस्थितीतही आष्टा पालिकेतील सत्तेतील विलासराव शिंदे यांना मानणारा गट जयंत पाटील यांच्यासोबतच राहिला. विधानसभा निवडणुकीत या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला.
आष्टा : आष्टा येथे माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शुक्रवार दि. ७ रोजी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने विलासराव शिंदे यांचे पुत्र व भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे व मंत्री जयंत पाटील एकत्र येत आहेत. यामुळे वैभव शिंदे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होऊन बेरजेचे राजकारण सुरू होणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आष्टा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. ७ रोजी विलासराव शिंदे यांच्या ह्यशक्तिस्थळह्ण या स्मारकाचे भूमिपूजन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होत आहे. वैभव शिंदे व विशाल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी मतदारसंघातून वैभव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली; मात्र माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी भाजपमधून, तर संभाजी कचरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यात अटीतटीची निवडणूक होऊन मोठा राजकीय संघर्ष रंगला आणि संभाजी कचरे विजयी झाले.
वैभव शिंदे यांचा विजय निश्चित आहे असे शिंदे गटाला वाटत होते; मात्र संभाजी कचरे यांच्या विजयानंतर जयंत पाटील गटाने सहकार्य केले नसल्याची भावना निर्माण झाली. वैभव शिंदे यांनी पक्षाचा त्याग करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आष्टा परिसर व तालुक्यात भाजप वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
आष्टा शहरात अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू करावे, आष्टा तालुका, एमआयडीसी व पालिकेला भरघोस निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले. यापैकी आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करून ते सुरू झाले. यामुळे विलासराव शिंदे यांचे सुमारे चाळीस वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले. आष्टा तालुका होण्यासाठी हे पहिले पाऊल पडले.
वैभव शिंदे यांना भाजप शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक पद दिले. अशा परिस्थितीतही आष्टा पालिकेतील सत्तेतील विलासराव शिंदे यांना मानणारा गट जयंत पाटील यांच्यासोबतच राहिला. विधानसभा निवडणुकीत या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला.
दरम्यान, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निधन झाले. या काळात भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांनीही शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले.