आष्ट्यात जयंत पाटील-विलासराव शिंदे गट आमने-सामने?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:42 AM2020-12-12T04:42:01+5:302020-12-12T04:42:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा पालिकेचा वर्धापन दिन नुकताच झाला. यावेळी पुढीलवर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा पालिकेचा वर्धापन दिन नुकताच झाला. यावेळी पुढीलवर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असे मत व्यक्त केल्याने येणारी पालिका निवडणूक माजी आमदार विलासराव शिंदे गट विरोधात जलसंपदा मंत्री जयंत पाटील गट अशी रंगणार की, गतवेळेप्रमाणे बेरजेचे राजकारण करीत शिंदे-पाटील गटाविरोधात विरोधी लोकशाही आघाडीत रंगणार, याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे.
आष्टा नगरपरिषदेत माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आहे. विलासराव शिंदे यांचे बंधू झुंजारराव शिंदे हे अध्यक्ष असलेल्या आष्टा शहर विकास आघाडीची १९९६ मध्ये पालिकेत सत्ता आली. त्यानंतर बेरजेच्या राजकारणामुळे दोन्ही गट एकत्र आले व पुढील निवडणुका एकत्र लढल्या. २००६ मध्ये माजी आमदार विलासराव शिंदे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने आष्टा नगरपालिका बिनविरोध केली. त्यानंतर २०११ व २०१६ ची पालिका निवडणूक दोन्ही गट एकत्र लढले. विरोधात काँग्रेससह सर्व विरोधक होते. २०१६ मध्ये २१ जागांपैकी विरोधी लोकशाही आघाडीच्या तिघांना विजय मिळाला, तर तीन अपक्ष निवडून आले.
आष्टा पालिकेचा १६७ वा वर्धापन दिन नुकताच झाला. यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, नेते वैभव शिंदे, पक्षप्रतोद विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, प्रकाश रुकडे, विराज शिंदे, माणिक शेळके, दिलीप वग्याणी, रघुनाथ जाधव, संग्राम फडतरे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, तेजश्री बोंडे आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
चाैकट
मैत्रीपूर्ण लढत द्यावी
माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या निधनामुळे विरोधकांना बाजूला ठेवण्यासाठी शिंदे-पाटील गटाने एकत्रित निवडणूक न लढवता मैत्रीपूर्ण लढत द्यावी, असे काही वक्त्यांनी मत व्यक्त केले. यावर शिंदे गटाने मौन बाळगले. त्यामुळे येणारी पालिका निवडणूक विलासराव शिंदे गट व मंत्री जयंत पाटील गट एकत्र लढणार की दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकणार, याविषयी शहरात चर्चा सुरू झाली आहे.
फोटो - विलासराव शिंदे, जयंत पाटील.