सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न विधानसभेत मांडणार : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:52 PM2018-11-09T22:52:35+5:302018-11-09T22:56:54+5:30
सार्वजनिक ग्रंथालयांना व्यंकाप्पा पत्की समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, सर्वच ग्रंथालयांचे अनुदान २००४ च्या चौपट करावे, ग्रंथालय सेवकांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात यासह
विटा : सार्वजनिक ग्रंथालयांना व्यंकाप्पा पत्की समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, सर्वच ग्रंथालयांचे अनुदान २००४ च्या चौपट करावे, ग्रंथालय सेवकांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात यासह ग्रंथालयांचे विविध प्रश्न विधानसभा अधिवेशनात मांडून ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करण्यास सरकारला भाग पाडू, असे आश्वासन राष्टवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिले.
खानापूर तालुका ग्रंथालय संघाच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांची भेट घेऊन, ग्रंथालयांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा अधिवेशनात पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी संघाचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी ग्रंथालयांच्या विविध प्रलंबित मागण्यांची आ. पाटील यांना सविस्तर माहिती दिली.
अॅड. मुळीक म्हणाले, राज्य शासन १९८० पासून दर सहा वर्षांनी सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात दुप्पट वाढ करीत होते. २००४ नंतर २०१० च्या दरम्यान अनुदानात दुप्पट व २०१६ च्या दरम्यान २००४ च्या चौपट अनुदानात वाढ होणे आवश्यक असताना, २०१२ ला अनुदानात केवळ ५० टक्के वाढ करण्यात आली. त्यानंतर ग्रंथालय संघ कर्मचारी संघटनेने वेळोवेळी मागणी करूनही अनुदानात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही.
ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी ग्रंथालयांना मिळणाऱ्या अनुदान गाव तेथे गंथालय आदी विषयावर शिफारस करण्यासाठी शासनाने प्रभा राव व व्यंकाप्पा पत्की अशा दोन समित्या नेमल्या होत्या. मात्र या दोन्ही समित्यांच्या शिफारशी शासनाने अद्याप स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे ग्रंथालयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे आ. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी आ. जयंत पाटील यांना ग्रंथालय संघाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आ. पाटील यांनी येत्या अधिवेशनात ग्रंथालयांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न संपुष्टात आणले जातील, अशी ग्वाही दिली.यावेळी विटा नगरवाचनालयाचे अध्यक्ष अॅड. संदीप मुळीक, ग्रंथपाल विक्रम चोथे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
विटा येथे ग्रंथालयांच्या विविध मागण्यांचे निवेदन संघाचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना देण्यात आले. अॅड. संदीप मुळीक, विक्रम चोथे यावेळी उपस्थित होते.