प्रकाश हॉस्पिटलच्या मान्यतेत जयंत पाटील यांचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:58+5:302021-05-05T04:44:58+5:30
इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटलांशी आमचे वैचारिक, राजकीय मतभेद आहेत. पण कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत ते खुनशी आणि कुरघोडीचे ...
इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटलांशी आमचे वैचारिक, राजकीय मतभेद आहेत. पण कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत ते खुनशी आणि कुरघोडीचे राजकारण करत आहेत. आमच्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये ६५० बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था व कोरोनावरील उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, प्रशासनाची तयारी असताना कोविडवरील उपचारासाठी मान्यता मिळू दिली जात नाही, असा आरोप नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, राजकारण व वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून जयंत पाटील यांना तीनदा दूरध्वनी केले, मेसेज केले, पण प्रत्युत्तर नाही. आमच्या हॉस्पिटलला स्वतः भेट द्या, व्यवस्था पाहा, वाटले तर परवानगी द्या. कोरोनाबाधितांना उपचाराअभावी मरू देऊ नका, अशी विनंती त्यांना केली.
त्यांनी कोविडसाठी एकही बेड उभा केला नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारण्याचे दिलेले आदेश खुद्द राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी धुडकावले. ते निष्क्रिय पालकमंत्री आहेत. मागच्या लाटेतही त्यांनी एक रुपया मिळवून दिलेला नाही, हे सर्वज्ञात आहे.
ते म्हणाले की, जिल्ह्यात ऑक्सिजन बेड मिळत नाही, रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळत नाहीत. लसीकरण ठप्प झाले आहे. याला पालकमंत्र्यांचे अपयश कारणीभूत आहे. प्रकाश हॉस्पिटलला पालकमंत्र्यांच्या दबावाखाली कोविडचे रुग्ण घेण्यासाठी परवानगी दिली जात नाही. शासनाने व स्वयंसेवी संस्थांनी जिल्ह्यासाठी दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी एकही आम्हाला मिळू दिले नाही. ६५० रुग्णांची व्यवस्था असताना मंजूर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असतील तर त्यांना ‘डिस्चार्ज’ द्या, असे सांगितले जाते. हा कुठला न्याय? त्यांनी कुठे जायचे? जयंतराव, त्यांची सोय तुम्ही करणार का?
यावेळी नगरसेवक वैभव पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, संदीप सावंत उपस्थित होते.