भाजयुमोतर्फे जयंत पाटील यांचा निषेध, सांगलीत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 03:32 PM2020-09-05T15:32:41+5:302020-09-05T15:35:00+5:30
आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर्सबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शनिवारी सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. पालकमंत्र्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.
सांगली : आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर्सबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शनिवारी सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. पालकमंत्र्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.
भाजयुमोचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना महामारीने सांगलीमध्ये भीषण स्वरूप धारण केले आहे.
सध्या सांगलीमध्ये शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये बेड व व्हेंटीलेटरची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू होत आहेत. याबाबत भाजपा युवा मोर्चाने वेळोवेळी जिल्हा प्रशासन, राज्य शासन व पालकमंत्र्यांंना निवेदने दिली होती. याप्रश्नी आंदोलनेही केली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्र्यानी रुग्णांना बेड मिळत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ७३ आय.सी.यु. बेड व ३१० आॅक्सिजन व प्रथमोपचार बेड उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती चूकीची व खोटी आहे.
आम्ही स्वत: रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यासंदर्भात कॉल सेंटरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून फोन करून व प्रत्यक्ष सांगलीमधील वेगवेगळया दवाखान्यामध्ये जावून चौकशी केली असता कुठेही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
पालकमंत्र्यांच्याकडून चूकीची व जनतेची दिशाभूल करण्याची आकडेवारी जाहीर केल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो. पालकमंत्र्यांनी सांगली जिल्हयातील जनतेची जाहिर माफी मागावी व सांगली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करावेत, अशी मागणी केली आहे.