जयंत पाटील यांच्यापुढे स्वकीयांचाच चक्रव्यूह...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:36 PM2018-09-09T23:36:28+5:302018-09-09T23:36:33+5:30
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यापुढे विरोधी भाजपपेक्षा राष्ट्रवादीतील मातब्बर नेत्यांना सांभाळण्याचेच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या दोन मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांच्या सोयीचे राजकारण करताना आमदार पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातील काही नेत्यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’ अशी आहे.
इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांची ताकद आहे. परंतु त्यांचे पुत्र वैभव शिंदे भाजपमय झाले आहेत. त्यामुळे विलासराव शिंदे यांच्यापुढे पुत्रप्रेम की जयंतप्रेम? हा प्रश्न उभा आहे. परिणामी आष्टा परिसरात बाळसं धरू पाहत असलेल्या भाजपला थोपविण्यासाठी जयंत पाटील यांनी आपला संपर्क वाढविला आहे.
इस्लामपूर मतदारसंघात ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या पाणी पुरवठा योजना स्वबळावर उभ्या आहेत. आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले साखर कारखाने सभासदांच्या उसाला दर देण्यात अग्रेसर आहेत, तर याच मतदार संघातील हुतात्मा संकुल जयंत पाटील यांच्याविरोधात कार्यरत आहे. परंतु वैभव नायकवडी यांनी आपल्या राजकीय सीमारेषा मर्यादित ठेवल्या आहेत.
इस्लामपुरात नव्याने आलेल्या डिग्रज मंडलामध्ये वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरातील नेत्यांनाही सांभाळण्याचे आव्हान आमदार पाटील यांच्यापुढे आहे. त्यामुळे जयंत पाटील यांची ताकद कायम ठेवण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. परंतु दिलीप पाटील यांनाच बँकेच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी जयंत पाटील यांचेच समर्थक आघाडीवर आहेत. अध्यक्षपदासाठी शिराळा मतदार संघातील माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावाची चर्चा होेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतीलच पदाधिकाऱ्यांना सांभाळणे जयंतरावांसमोर मोठे आव्हान आहे.
शिराळा मतदारसंघात पारंपरिक लढती ठरलेल्या आहेत. आघाडी काँग्रेसचा तिढा सोडविताना जयंत पाटील यांची नेहमीच दमछाक होते. यावेळचीही परिस्थिती वेगळी नाही. भरीस भर म्हणून मानसिंगराव नाईक यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावर दावा करून आगामी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. सत्यजित देशमुख यांचा प्रश्न राष्ट्रवादीला सतावणार आहे. याचा फायदा शिवाजीराव नाईक यांना ठरलेला असतो. यावेळी मात्र ४९ गावांतील युवा नेतृत्व सम्राट महाडिक यांनी शिराळा विधानसभा लढविण्याचे ठरविले आहे. याचेही आव्हान जयंतरावांपुढे राहणार आहे.
भाजपच्या हालचाली : ताकद वाढीसाठी
एकंदरीत इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना इस्लामपुरातील भाजप सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तोकडी पडत आहे, तर शिराळ्यात आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून भाजपची ताकद आजही तळ्यात-मळ्यात आहे. त्यामुळेच भाऊगर्दी असल्यास राष्ट्रवादीतील नेत्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. याचाच फायदा भाजप उठवत असल्याचे चित्र आहे.