जयंत पाटील यांचे बाहुबल वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:00 AM2018-04-24T01:00:26+5:302018-04-24T01:00:26+5:30
सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर जिल्ह्याला दुसऱ्यांदा राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता जयंत पाटील यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील त्यांचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणाचा अनुभव असणाºया नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचा समावेश होतो. आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील या त्रिमूर्र्तींनी एकाचवेळी मंत्रीपदे व राज्यातील महत्त्वाची पदे सांभाळून सांगलीचा दबदबा निर्माण केला होता. त्यातील आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपविरोधात आता जयंत पाटील यांची लढाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा विचार पक्षीय स्तरावर सुरू झाला आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्टÑातील राष्टÑवादीच्या काही आमदारांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांचे नाव पक्षश्रेष्ठींना सुचविल्याचे समजते. याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. तरीही प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आर. आर. पाटील यांनी यापूर्वी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते. त्यानंतर जिल्ह्याला ही संधी दुसºयांदा जयंत पाटील यांच्या माध्यमातून मिळू शकते. या पदावर त्यांची वर्णी लागली, तर जिल्ह्यातील राष्टÑवादीला मोठे बळ मिळणार आहे. सध्या पाटील यांच्यासाठी भाजप व अन्य विरोधकांनी चक्रव्यूह रचला आहे. त्यांना मतदारसंघातच थोपवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे त्यांच्या संघर्षाला या पदाच्या माध्यमातून बळ मिळू शकते. पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी त्यांना या पदाची मदत होऊ शकते. आजही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जयंत पाटील यांना मानणारा गट आहे. पाटील यांनी गेल्या काही वर्षात तालुकानिहाय समर्थक, कार्यकर्त्यांच्या गटाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. महापालिका क्षेत्रात मात्र आता निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पदे वाटपावरून होणारे वाद मिटविताना त्यांना मर्यादा येत आहेत. अशावेळी पक्षाचे राज्याचे पद मिळाले, तर वाद मिटवून संघटन अधिक मजबूत करता येऊ शकेल. त्यामुळे त्यांना पद मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. या चर्चेने पक्षांंतर्गत वातावरणात बदल झाला आहे.
महापालिका निवडणुकीत : फायदा
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक आता जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले, तर त्याचा फायदा स्थानिक पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड व्हावी, अशी इच्छा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
निकटवर्तीय नेत्यांना आशा!
जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांना या पदाबाबत आशा वाटते. राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये जयंत पाटील यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.