जयंत पाटलांनाच भाजपमध्ये घेणार: चांगल्या नेत्यांसाठी दरवाजे खुले-रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:50 PM2019-01-14T23:50:51+5:302019-01-14T23:51:30+5:30
विरोधी पक्षात अनेक चांगले लोक अजूनही आहेत. अशा लोकांसाठी भाजपचे दरवाजे कायम खुले राहतील. जयंत पाटील आम्हाला कुठे दिसले तर, त्यांनाही भाजपमध्ये घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सांगली : विरोधी पक्षात अनेक चांगले लोक अजूनही आहेत. अशा लोकांसाठी भाजपचे दरवाजे कायम खुले राहतील. जयंत पाटील आम्हाला कुठे दिसले तर, त्यांनाही भाजपमध्ये घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, भाजपची ताकद ही आयात उमेदवारांची असल्याबद्दल जयंत पाटील वारंवार बोलतात, पण तेसुद्धा मूळचे राष्टÑवादीचे नाहीत. कॉँग्रेस सोडूनच ते राष्टÑवादीत आले आहेत. कोणताही पक्ष आयात उमेदवारांशिवाय उभा राहिलेला नाही. त्यामुळे विरोधकांमधील चांगल्या लोकांना भाजप पक्षात घेणारच. जयंत पाटील कुठे आम्हाला दिसले तर, त्यांनाही आमच्याकडे घेऊ शकतो. पक्षात नव्या आणि जुन्या लोकांचा ताळमेळ कसा राखायचा, ही जबाबदारी पक्षाची आहे. आम्ही ती सक्षमपणे पार पाडू. पक्षांतर्गत मतभेद हा चिंतेचा विषय नाही.
अनेक घटक पक्षांना घेऊन आम्ही लोकसभा निवडणुका लढवित आहोत. काही पक्ष आम्हाला सोडून जाण्याच्या तयारीत असले तरी, अन्य काही पक्ष आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. त्यामुळे अशा गोष्टीमुळे भाजपला काही नुकसान होणार नाही.
शिवसेनेबाबत आम्ही अजूनही आशावादी आहोत. समविचारी पक्षांनी एकत्र राहिले पाहिजे. विरोधकांना त्याचा फायदा होऊ नये, असे आमचे मत आहे. पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला उद्देशून कोणतीही टीका केलेली नाही. त्यांचा इशारा अन्य विरोधी पक्षांच्या आघाड्यांबद्दल होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भाजप आगामी निवडणुकांत सत्तेवर आला तर, पुढील पन्नास वर्षे तो सत्तेवरून बाजूला होणार नाही, याची खात्री विरोधकांना झाल्यानेच ते एकत्र येऊन ताकद आजमावत आहेत.
विद्यमान खासदारांना : उमेदवारी मिळेल
राज्यातील एकाही विद्यमान खासदाराचे तिकीट कापण्यात येणार नाही. सर्वच ठिकाणी पक्षाच्या खासदारांनी चांगली कामे केली आहेत. तरीही पक्षात पार्लमेंटरी बोर्डामार्फत उमेदवारीचा निर्णय घेतला जातो. त्या प्रक्रियेतून उमेदवारी निश्चित होईल. इच्छुक म्हणून कुणीही पक्षाकडे अर्ज करू शकतो, असे दानवे म्हणाले.
हातकणंगलेत घटक पक्षाचा शोध
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आम्ही घटक पक्षासाठी जागा सोडणार आहोत. त्याठिकाणी चांगल्या ताकदीचा घटक पक्ष मिळाल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असे दानवे म्हणाले.
पडळकरांचा राजीनामा नाही
गोपीचंद पडळकरांची स्वतंत्र मोर्चेबांधणी चालू आहे. त्यांचे सध्या काय चालू आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी भाजपचा अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यांची नाराजी दूर करणे किंवा त्यांच्याबाबत कोणती भूमिका घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे दानवे म्हणाले.
निवडणूक मोडमध्ये या : दानवे
सारे विरोधक आता एकवटले आहेत. त्यामुळे आपण अधिक सावध झाले पाहिजे. कार्यकर्त्यांनी स्वत:ला आता निवडणूक मोडमध्ये सेट करावे, असे आवाहन दानवे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. दानवे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. येथील धामणी रस्त्यावरील खरे क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पदाधिकारी नीता केळकर, मकरंद देशपांडे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, तात्या बिरजे, शरद नलवडे, सुरेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.