‘झेडपी’त जयंतरावांनी राखला राजकीय समतोल

By admin | Published: April 13, 2016 10:39 PM2016-04-13T22:39:42+5:302016-04-13T23:24:36+5:30

शिवसेनेला दूर ठेवले : उपाध्यक्ष पदासह तीन सभापतीपदे राष्ट्रवादीला, एक भाजप समर्थकाला

Jayanta Rao's political balance in Z.P. | ‘झेडपी’त जयंतरावांनी राखला राजकीय समतोल

‘झेडपी’त जयंतरावांनी राखला राजकीय समतोल

Next

अशोक डोंबाळे -- सांगली --जानेवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. शिवसेना, भाजप समर्थक सदस्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा चाणाक्ष निर्णय त्यांनी घेतला. जतमध्ये भाजप समर्थकाला संधी देताना, तेथील राष्ट्रवादीला बळ देण्याचाही प्रयत्न केला. खानापूर आणि आटपाडी तालुक्यात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर समर्थक सदस्यांना सत्तेपासून दूर ठेवत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाला संधी दिली आहे.मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर असणारे खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे हे नेते भाजपबरोबर गेले आहेत. अनिल बाबर शिवसेनेच्या चिन्हावर आमदार झाले आहेत. या नेत्यांच्या समर्थक सदस्यांची संख्या आठ आहे.
राष्ट्रवादीतून हे नेते बाहेर पडल्यानंतर प्रथमच जिल्हा परिषद पदाधिकारी बदल झाल्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. हे नेते जयंत पाटील यांचे समर्थकच मानले जातात. त्यामुळे पदाधिकारी बदलामध्ये कोणतीही गडबड होणार नाही, याची जयंत पाटील यांना खात्री होती. पण, त्या नेत्यांच्या समर्थकांना संधी दिल्यास राष्ट्रवादीचे सदस्य नाराज होणार असल्यामुळे, त्याचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिवसेना व भाजपमधील नेत्यांच्या समर्थक सदस्यांना जिल्हा परिषदेची पदे दिली तर भविष्यातील निवडणुकांमध्ये त्याचा फटका पक्षाला ासणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच शिवसेना आणि भाजप समर्थकांना त्यांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे. उपाध्यक्ष आणि चार सभापती पदांच्या निवडीमध्ये केवळ एकच सभापतीपद भाजपचे आमदार विलासराव जगताप समर्थक संजीवकुमार सावंत यांना दिले. उर्वरित चार पदे कट्टर राष्ट्रवादी समर्थक सदस्यांनाच देऊन पक्षबांधणीकडे लक्ष दिले आहे. यामध्ये कामेरी (ता. वाळवा) गटातील रणजित पाटील यांना उपाध्यक्षपदी संधी देऊन तेथे पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. रांजणी (ता. कवठेमहांकाळ) गटातील अजितराव घोरपडे समर्थक तानाजी यमगर यांचे बुधवारी सकाळपर्यंत सभापतीपद निश्चित होते.
पण, आमदार सुमनताई पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत कुची (ता. कवठेमहांकाळ) गटातील सदस्य भाऊसाहेब पाटील यांना सभापतीपद देण्याचा आग्रह धरला. अखेरच्या क्षणी यमगर यांना थांबवून पाटील यांना संधी देण्यात आली. जतमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी समर्थक सदस्यांची संख्या समान आहे. भाजपचे आमदार जगताप यांनी संजीव सावंत यांना संधी देण्याची आक्रमक मागणी केली होती. त्यानुसार त्यांना सभापती पदाची संधी मिळाली आहे. या पदाने राष्ट्रवादीला बळ मिळण्याऐवजी भाजपलाच बळ मिळण्यास मदत होणार असल्यामुळे राष्ट्रवादीबरोबर असणारा गट नाराज झाला होता. अखेर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या दरीबडची (ता. जत) गटातील सदस्या सुनंदा पाटील यांना संधी देऊन, कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
खानापूर, आटपाडी तालुक्यात मात्र जयंत पाटील यांनी कठोर भूमिका घेतल्याचे चित्र आहे. अर्थात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे जयंत पाटील यांच्याशी फारसे सख्य नसल्याचाही तो परिणाम असेल. बाबर यांच्याकडे खानापूर आणि आटपाडी तालुक्यात तीन सदस्य असतानाही या समर्थकांना संधी मिळाली नाही. उलट खरसुंडी (ता. आटपाडी) गटातील कुसूम मोटे यांना सभापतीपदी संधी देऊन राजेंद्रअण्णा देशमुख गटाला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाबर समर्थक फिरोज शेख, तानाजी पाटील नाराज झाले आहेत.

काँग्रेसची ‘बोलाचीच कढी...’
काँग्रेसने अर्ज दाखल केले. मात्र यामध्ये पक्षाच्या वरिष्ठ एकाही नेत्याचा थेट सहभाग नव्हता. विरोधी पक्षनेते सुरेश मोहिते, सम्राट महाडिक, रणधीर नाईक यांनी पुढाकार घेतला होता. पण, शेवटच्याक्षणी पक्षातील काही सदस्यांनी दांडी दिल्यामुळे त्यांची पंचाईत झाली. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर समर्थक तीन सदस्यांना भेटून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न झाला. या सदस्यांनी, ‘राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्यामुळे तुम्हाला कसा पाठिंबा देणार?’, असा सवाल केला. भीमराव माने यांच्याकडे पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी विनंती केली. त्यांनीही, ‘आपण राष्ट्रवादीचे असल्यामुळे तुम्हाला कसा पाठिंबा देणार?’, असा सवाल केला. काँग्रेस नेत्यांकडून काहीच रसद मिळत नसल्यामुळे शेवटी काँग्रेस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसच्या सदस्यांनी कोणतेही नियोजन न करता उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांची उमेदवारी म्हणजे ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ ठरली.

Web Title: Jayanta Rao's political balance in Z.P.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.