जयंतरावांचे दुष्काळी तालुक्यांत ‘जलास्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:39+5:302021-05-27T04:27:39+5:30

कवठेमहांकाळ : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे सध्या दुष्काळी भागामध्ये म्हैसाळ, टेंभू योजनांचे पाणी सोडल्यामुळे टंचाई संपली आहे. या ...

Jayantarao's 'Jalastra' in drought-hit talukas | जयंतरावांचे दुष्काळी तालुक्यांत ‘जलास्त्र’

जयंतरावांचे दुष्काळी तालुक्यांत ‘जलास्त्र’

Next

कवठेमहांकाळ : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे सध्या दुष्काळी भागामध्ये म्हैसाळ, टेंभू योजनांचे पाणी सोडल्यामुळे टंचाई संपली आहे. या ‘जलास्त्रा’ने दुष्काळी पट्टा सुखावला आहे. तासगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांना म्हैसाळ व टेंभू योजना वरदान ठरल्या आहेत. परंतु अपुरी कामे, अपूर्ण पोटपाट, नियमित पाण्याचा अभाव, पाणीपट्टीचा प्रश्नही सोडविण्याची गरज आहे.

दुष्काळी पट्ट्यातील काहीजण आजही म्हैसाळ आणि टेंभू योजनांच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ही कामे पूर्ण करून दुष्काळी तालुक्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. २००४ मध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना, पाटील यांनी त्यावेळी कृत्रिम पाऊस पाडला होता. त्यावेळी त्यांच्या ‘जयंत नक्षत्रा’ची राज्यात चर्चा झाली होती.

यावेळी दुष्काळी भागात पाटील यांच्या ‘जलास्त्रा’ची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात जत तालुक्यातील उमदीपर्यंत त्यांच्यामुळे टेंभूचे पाणी मिळाले. जत तालुक्यातील जनतेला पाटील यांचे वडील दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांची आठवण झाली. पाटील यांनी बापूंचे स्वप्न, जतच्या शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

जतला पाणी जात असताना, कवठेमहांकाळ तालुका दुर्लक्षित राहू नये यासाठी त्यांनी तालुक्यातील सर्व म्हैसाळ, टेंभूची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, यासाठी जिल्हास्तरावर बैठक घेतली. ढालगाव, नागज, कुंडलापूर, गर्जेवाडी, जाखापूर, तिसंगी, वाघोली, घाटनांद्रे, केरेवाडी, चुडेखिंडी परिसराला टेंभूचे पाणी मिळावे, यासाठीही त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

चौकट

अपूर्ण कामांना गती

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव उपसा सिंचन योजना पूर्ण होत आहे. ढालगाव व घाटमाथा परिसरात टेंभूची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. म्हैसाळ व टेंभू योजनेच्या पोटकालव्यांची कामे लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. विस्तारित गव्हाण योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, तलाव, जाखापूर, केरेवाडी ही गावे सिंचनाखाली आणण्यासाठी जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात ताकद लावली आहे. या कामासाठी त्यांची काही राज्यस्तरावरील नेत्यांशी तात्त्विक वादही झाल्याची चर्चा आहे. पाटील यांनी कवठेमहांकाळ, जत, तासगाव, आटपाडी या तालुक्यांतील सिंचन योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.

Web Title: Jayantarao's 'Jalastra' in drought-hit talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.