जयंतरावांच्या चिरंजीवांची सहकारातून राजकारणाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:21+5:302021-01-10T04:19:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यात ऊस पिकासाठी मुबलक पाणी आहे. तेथे ठिबक सिंचन योजना राबवून ऊस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात ऊस पिकासाठी मुबलक पाणी आहे. तेथे ठिबक सिंचन योजना राबवून ऊस उत्पन्नवाढीचा प्रयत्न जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील करीत आहेत. या संपर्कातून ते राजारामबापू पाटील सहकारी कारखान्याची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.
राजारामबापू यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांनी थेट राजकारणात प्रवेश केला नाही. सुरुवातीला कमी वयातच त्यांनी वाळवा (सध्याचा राजारामबापू कारखाना) सहकारी साखर कारखान्याची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर वाळवा तालुक्यातील जमीन पाण्याखाली येण्यासाठी पदयात्रा काढली. पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदारीबरोबर मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्रिपद आहे. इस्लामपूर, आष्टा शहरांसह राजारामबापू उद्योग समूहात त्यांच्या गैरहजेरीत निर्णय घेणारे नेतृत्व नाही. ती जबाबदारी पेलण्यासाठी प्रतीक व राजवर्धन ही दोन्ही मुले सक्षम आहेत का, याची पाटील यांनी गेल्या चार-पाच वर्षांत चाचपणी केली आहे. यामध्ये प्रतीक पाटील उत्तीर्ण झाले आहेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यापासून प्रतीक पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातच तळ ठोकला आहे.
इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीची पीछेहाट झाली, त्याची सल जयंत पाटील यांच्या मनात आहे. त्यातच त्यांचे विश्वासू विजयभाऊ पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षबांधणीसाठी शहरात बूथ कमिट्या सक्षम करणे आणि जनतेत जाऊन प्रश्न मार्गी लावण्याचा कार्यक्रम जयंत पाटील यांनी हाती घेतला. या संपर्कदौऱ्यात प्रतीक पाटील यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय होता. दोन दिवसांपूर्वी तर ज्यांनी आयुष्य साखर कारखान्याच्या राजकारणात घालविले, अशा ज्येष्ठ संचालकांनाही प्रतीक पाटील यांनी ठिबक सिंचनावर मार्गदर्शन केले. त्यांची पावले राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाकडे वळू लागल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात यावर जयंत पाटील यांचाच निर्णय अंतिम राहील.
फोटो-०९प्रतीक पाटील