जयंतरावांची आढावा बैठक फक्त कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:27+5:302021-04-29T04:19:27+5:30
इस्लामपूर येथे बुधवारी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान शिराळा नाक्यावर भाजी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. तर दुसऱ्या छायाचित्रात ...
इस्लामपूर येथे बुधवारी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान शिराळा नाक्यावर भाजी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. तर दुसऱ्या छायाचित्रात रस्त्यावरील वर्दळ कमी करण्यापेक्षा पोलीस मोबाईलमध्ये मग्न झाल्याचे चित्र होते.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. परंतु त्यांच्याच मतदारसंघातील इस्लामपूर आणि परिसरात कोरोनाचा कहर वाढत आहे. स्वत: जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेऊन कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या तरी शहरात भरणारी भाजी मंडई आणि रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पालिका प्रशासन आणि पोलिसांचा वचक राहिलेला नाही.
शासनाने पंधरा एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी जाहीर केली आहे. यामध्ये भाजीपाला, फळे, किराणा यांना सकाळी ७ ते ११ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. याचाच फायदा व्यापारी उठवत आहेत. आठवडी बाजार बंद केला असला तरी शिराळा नाका आणि बहे रोडवरील भाजी आणि फळविक्रेते रस्त्यावरच बसतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. सकाळी साडेनऊ ते अकराच्या दरम्यान शहरातील मुख्य रस्ते आणि भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या दीड तासातच कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याने प्रत्येक दौऱ्यात आढावा बैठक घेतली जाते. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी विविध योजना राबविण्याचे आदेश देऊनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सकाळी ७ ते ११ अत्यावश्यक सेवा चालूच असतात. परंतु ज्या अत्यावश्यक सेवा नाहीत, त्याही सेवा चोरून सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने पानपट्टीधारक, चहाच्या टपऱ्या, घरगुती साहित्याची दुकाने सुरू असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा लोंढा अधिकच वाढला असून शहरापेक्षा ग्रामीण भागातच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
कोट
शिराळा नाका व बहे रोडवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर बसणे, गर्दी करणे योग्य नाही. त्याचे नियोजन पालिका प्रशासनाचे आहे. पोलीस विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाई करीत आहेत. परंतु ७ ते ११ च्या दरम्यान विविध कारणाखाली नागरिक रस्त्यावर दिसत आहेत.
नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक
चौकट
नियमांचे उल्लंघन
कोरोनाचा कहर पाहता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही आपल्या मतदारसंघात विविध उपाय सुचविले आहेत. त्यांचे पुत्र प्रतीक पाटील लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु नागरिकच मात्र संचारबंदीचे नियम पाळत नसल्याचे चित्र आहे.