मंत्रिमंडळ बदलाबाबत जयंतरावांचे मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:46+5:302021-03-21T04:24:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलात जयंत पाटील यांच्याकडे अर्थखाते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलात जयंत पाटील यांच्याकडे अर्थखाते किंवा गृह खात्याची जबाबदारी सोपवली जाईल, असे बोलले जात असून, याबाबत विचारले असता, पाटील यांनी मौन बाळगणे पसंद केले.
मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटके, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची अटक आणि तपास या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीमध्ये आता शरद पवार यांचे खास विश्वासू म्हणून जयंत पाटील यांचे नाव घेतले जाते. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला, तर या खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः घेतील आणि अर्थखाते जयंत पाटील यांना देतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. महापूर, अतिवृष्टी, कोरोना, कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना तिजोरीत खडकडाट होता. त्या आर्थिक अडचणीत जयंत पाटील यांनी दीर्घकाळ अर्थ खाते सांभाळून आर्थिक परिस्थिती सुधारली होती. फेरबदल झाला तर पाटील यांच्याकडील जलसंपदा खात्यासाठी विदर्भातील नव्या चेहऱ्याला राष्ट्रवादीतून संधी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबत शनिवारी जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी मौन बाळगणे पसंद केले. कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नाही.