जयंतरावांची इच्छा म्हणून मी महाराष्ट्रातून लगेच जाईन असे नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:31 AM2021-09-10T04:31:56+5:302021-09-10T04:31:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नेहमी अतिवृष्टी, पूर अशी संकटे असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असायची; पण ...

Jayantarao's wish is not that I will leave Maharashtra immediately! | जयंतरावांची इच्छा म्हणून मी महाराष्ट्रातून लगेच जाईन असे नव्हे!

जयंतरावांची इच्छा म्हणून मी महाराष्ट्रातून लगेच जाईन असे नव्हे!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : नेहमी अतिवृष्टी, पूर अशी संकटे असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असायची; पण मी आल्यापासून येथेही पाऊस सुरू झालाय, पूर येतोय; पण जयंत पाटील यांची इच्छा म्हणून मी लगेच परत जाईन असे नाही, अशी फटकेबाजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. मी गेल्यास नुकसान होईल. आता काय नुकसान होत आहे का, अशी विचारणाही त्यांनी जयंत पाटील यांना केली. राज्यपालांच्या मिश्कील राजकीय कोट्या उपस्थितांनी हसण्यावारीच घेतल्या.

प्रसंग होता कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कार्यक्रमाचा. दीपाली भोसले-सय्यद ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांच्या मुलींना मदत प्रदान कार्यक्रमासाठी राज्यपाल कोश्यारी गुरुवारी येथे आले होते. या कार्यक्रमात त्यांनी दिलखुलास फटकेबाजी केली. ते म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन पाटलांच्या (जलसंपदामंत्री जयंत पाटील व केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील) मध्ये बसण्याची संधी मिळाली. दीपाली भोसले-सय्यद यांच्या कामाबद्दल सरकारने सत्कार करावा, यामुळे आणखी लोक मदतीसाठी पुढे येतील. अनेकांकडे पैसे आहेत, सगळेच माझ्यासारखे गरीब नाहीत!

प्रोटोकाॅलच्या अतिरेकाबद्दल नाराजी

कार्यक्रमासाठी प्रोटोकॉलची काटेकोर अंमलबजावणी पोलीस व महसूल प्रशासनाने केली होती. खासदार धैर्यशील माने व दीपाली सय्यद यांचा भाऊदेखील त्यातून सुटला नाही. माने यांना कवठेपिरान रस्त्यावरच पोलिसांनी अडवले. कार्यक्रमस्थळी जाण्यास प्रतिबंध केला. शेवटी माने स्वत: गाडीतून उतरले. ओळख करून दिली, त्यानंतर पोलिसांनी सोडले. सय्यद यांचे भाऊदेखील शेवटपर्यंत कार्यक्रमस्थळी येऊ शकले नाहीत. अधिकृत प्रवेशपत्राअभावी शेवटपर्यंत बाहेरच थांबून राहावे लागले. सय्यद यांनी राज्यपालांसमोर जाहीर कार्यक्रमातच नाराजी व्यक्त केली. याविषयी राज्यपाल म्हणाले की, प्रोटोकाॅल मलाही आवडत नाही; पण अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या जातील म्हणून पाळावा लागतो. यापुढे असे होऊ नये, असे मी वारंवार सांगतो. प्रोटोकॉल हेच मुख्य काम होऊन बसते, खरे काम बाजूलाच राहते. जरा माणुसकी ठेवा. राज्यपाल म्हणजे बाहेरून येणारा वाघ किंवा सिंह आहे का? भगतसिंह कोणाला घाबरत नाही, हे सर्वांना माहिती आहे.

Web Title: Jayantarao's wish is not that I will leave Maharashtra immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.